घाटातील खचलेली कडा अपघातास आमंत्रण
By admin | Published: November 8, 2014 01:46 AM2014-11-08T01:46:12+5:302014-11-08T01:46:12+5:30
पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे...
पुसद : पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असून वाहनचालकास हा रस्ता अनोळखी असल्यास केव्हाही अपघात होऊ शकतो. यवतमाळ-मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी दैनंदिन प्रवासी वाहतूक होणाऱ्या या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे.
पुसद-वाशिम मार्गावर सारखी रहदारी असते. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर पुण्या-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स्ची दररोज ये-जा असते. खंडाळा घाटात ऐन वळणावरच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडा खचलेल्या आहेत. वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतात रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खचलेल्या कडांचा अंदाज येत नाही. घाटाचा रस्ता असल्याने एखाद्या वाहनाचे चाक रस्त्याच्या खाली उतरले तर मोठा अपघात होऊ शकतो. गेल्या सहा महिन्यात कित्येक अपघातांची नोंद झाली आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली पावसाळ्यात नादुरुस्त रस्त्यांचे अहवाल संबंधित उपअभियंत्यांकडून मागविण्यात आले होते. ‘लोकमत’मध्ये खचलेल्या कडांचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बांधकाम विभागाने मध्यंतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून घाटातील कडा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
प्रशासकीय यंत्रणेचे किरकोळ कामाकडे वारंवार दुर्लक्ष असून मोठ्या कामांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. कोट्यवधींचा निधी येऊनही या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीची कामे हाती घेतली खरी, परंतु चित्र काही वेगळेच दिसते आहे. रस्त्याच्या डागडुजीचे कंत्राट देणाराकडे संबंधित कामाची सर्वस्वी जबाबदारी असते. सदर कंत्राटदाराकडून काही दोष राहिल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करावी लागते.
कडा खचून पडलेल्या खड्यांमुळे एखादा अपघात घडल्यास त्या ठेकेदाराला दोषी ठरविण्याचे शासनाचे नियम आहेत. गत सहा महिन्यांपासून या रस्त्यांवर काही चारचाकी व अनेक दुचाकी वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची कुठलीही कारवाई झालेली नाही. परिणामी अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)