आयपीएल क्रिकेट स्पर्धा : लिलावात १० लाखांची बोली
By admin | Published: February 7, 2016 12:35 AM2016-02-07T00:35:38+5:302016-02-07T00:35:38+5:30
येथील फिरकी गोलंदाज अक्षय किसन कर्णेवार याची आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघात निवड झाली आहे.
नरेश मानकर पांढरकवडा
येथील फिरकी गोलंदाज अक्षय किसन कर्णेवार याची आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघात निवड झाली आहे. या संघाच्या मालकाने त्याला १० लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे.
गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत देशातील विविध संघ सहभागी होतात. या संघांमध्ये देशी क्रिकेट खेळाडूंसोबतच विदेशी खेळाडूंचाही समावेश असतो. सन २०१६ च्या सत्रात या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यात रॉयल चॅलेंजर बेंगलुरू संघाने १० लाखांची बोली लावून येथील दोन्ही हाताने फिरकी गोलंदाजी करणारा अक्षय कर्णेवार याला आपल्या संघात घेतले आहे. विशेष म्हणजे अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करीत असल्याने त्याच्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरण्याची शक्यता आहे.
क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या अक्षय किसन कर्णेवार या युवकाने शहराचे नाव चमकविले आहे. आता त्याची आयपीएल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
येथील के.इ.एस. हायस्कूलच्या क्रीडांगणावर तो रोज क्रिकेट खेळायचा. त्याला बाळू नवघरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सततचा सराव आणि मार्गदर्शनातून अक्षय कर्णेवार याने ही भरारी घेतली आहे.
दोन्ही हाताने फिरकी गोलंदाजी
मुंबई येथील वानखडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० सैय्यद मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विदर्भाकडून त्याने गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने बडोदा चमूविरुध्द झालेल्या सामन्यात एका ओव्हरमधील सहाही चेंडू हात बदलवून टाकले होते. त्यामुळे फलंदाज त्रस्त झाले होते. त्याच्या या ‘रँडम बॉलिंग स्टाईल’ने भारतीय क्रिकेट जगतातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
क्रिकेटपटू बनण्याची माझा भाऊ केशव याची इच्छा होती. परंतु परिस्थितीमुळे तो बनू शकलो नाही. पुतण्या अक्षयने तरी क्रिकेट जगतात आपले नाव रोशन करावे अशी त्याच्या काकांची इच्छा होती. ती आता या निवडीमुळे पूर्ण झाली आहे.
- किसन कर्णेवार
(क्रिकेटपटू अक्षयचे वडील)
सुभाष मंडळाचा अनिल ‘प्रो-कबड्डी’त
यवतमाळ - येथील वडगावस्थित सुभाष क्रीडा मंडळाचा अव्वल कबड्डीपटू अनिल श्रीराम निंबोळकर याची प्रो-कबड्डीमध्ये वर्णी लागली आहे. त्याच्यावर १२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. तो इंडियन बॉर्डर पोलीस संघातून खेळतो आहे. अनिल हा बुलडाणा जिल्ह्याच्या निकमानपूरचा रहिवासी आहे. त्याचे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळात झाले. त्याच्यातील क्रीडा गुण ओळखून सुभाष क्रीडा मंडळाने १९९५ पासून त्याचा शिक्षण, निवासाचा खर्च केला. सुभाष क्रीडा मंडळाचा उत्तम कबड्डीपटू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला. त्याने पाच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा गाजविल्या आहे. तो दिल्ली पोलीसचा जवान आहे.