सवना येथील सिंचन वसाहतीची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:44 PM2017-10-16T23:44:59+5:302017-10-16T23:45:54+5:30
तालुक्यातील सवना येथे असलेल्या सिंचन विभागाच्या वसाहतीची प्रचंड दुरावस्था झाली असून घाणीचा विळखा पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील सवना येथे असलेल्या सिंचन विभागाच्या वसाहतीची प्रचंड दुरावस्था झाली असून घाणीचा विळखा पडला आहे. या वसाहतीत स्वतंत्र शौचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. तसेच ही वसाहत ४५ वर्षांपूर्वीची असून डागडुजी झाली नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात.
तालुक्यात वेणी येथे अधरपूस प्रकल्पाचे बांधकाम चालू असताना या निवासस्थानाची उभारणी करण्यात आली. टीनपत्रे टाकून कर्मचाºयांसाठी व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक निवासस्थानात शौचालय नाही. त्यामुळे कर्मचाºयांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उघड्यावरच जावे लागते. या वसाहतीत सर्वत्र गाजर गवत वाढले आहे. तसेच सरपटणाºया विषारी प्राण्यांचीही भीती असते. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. परंतु सिंचन विभागाने या वसाहतीची डागडुजी कधीच केली नाही. एवढेच नाही तर येथे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. रहिवासी वर्गणी करून पाणी विकत घेत असल्याचे सांगण्यात आले. अनेकवेळा पाण्यासाठी येथील रहिवाशांना भटकंती करण्याशिवाय पर्याय नसतो.