सिंचन तलाव अद्याप तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:17 PM2019-07-04T21:17:07+5:302019-07-04T21:17:35+5:30

यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.

The irrigation lake is still thirsty | सिंचन तलाव अद्याप तहानलेलेच

सिंचन तलाव अद्याप तहानलेलेच

Next
ठळक मुद्देवणी उपविभाग : आठ तलावांमध्ये ११.९ टक्के जलसाठा कमी

म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत.
मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील सिंचन तलावात सर्वात कमी जलसाठा, तर वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावात सर्वाधिक जलसाठा आहे. वणी तालुक्यात दोन, तर मारेगाव तालुक्यात सहा सिंचन तलाव आहे. शेतातील सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी हे तलाव तयार करण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षात अल्प पर्जन्यमानामुळे अनेकदा डिसेंबर महिन्यातच हे तलाव कोरडे पडतात. त्यामुळे शेती सिंचनाची परिस्थिती बिकट होऊन जाते. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. परंतु अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सून उशिरा दाखल झाला. गेल्या आठवड्यापासून या भागात पावसाने जोर पकडला असला तरी पावसाची झड मात्र अद्यापही अनुभवली नाही. वणी तालुक्यातील रासा येथील सिंचन तलावाची साठवण क्षमता १.२६३ दलघमी आहे. मात्र यावर्षी या तलावात ३८.७१ टक्के जलसाठा आहे.
बोर्डा तलावाची क्षमता २.००३ दलघमी एवढी आहे. यावर्षी या तलावात केवळ ३.६९ टक्के जलसाठा आहे. मारेगाव तालुक्यातील शिवनाळा तलाव १९.९२ टक्के भरला आहे. या तलावाची साठवण क्षमता ०.७७८ दलघमी आहे. रामपुरा तलाव ३.१९ टक्के भरला असून तलावाची क्षमता १.३१८ दलघमी आहे. नरसाळा तलाव ३१.३७ टक्के भरला आहे. या तलावाची क्षमता १.३४८ दलघमी आहे. खंडणी तलाव १४.३२ टक्के भरला असून या तलावाची क्षमता ३.०६७ दलघमी एवढी आहे. म्हैसदोडका तलावाची साठवण क्षमता ०.८२० दलघमी आहे. हा तलाव केवळ ६.५८ टक्के भरला आहे. पेंढरी तलावाची जलसाठ्याची क्षमता २.५६८ दलघमी आहे. हा तलाव केवळ १० टक्के भरला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी यंदा हंगामाचे नियोजन केले. मात्र पाऊसच उशिरा आल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडून गेले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली. या हंगामात चांगला पाऊस आला तरच हे सिंचन तलाव भरण्याची शक्यता आहे.
आॅगस्टपर्यंत तलाव १०० टक्के भरण्याची अपेक्षा
यंदाच्या हंगामात पावसाचा जोर चांगला राहिल्यास आॅगस्ट महिन्यापर्यंत वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलाव १०० टक्के भरतील, असा विश्वास कालवा निरीक्षक नितीन करमरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: The irrigation lake is still thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.