इसापूरचे पाणी पात्रात आलेच नाही
By admin | Published: April 22, 2017 01:47 AM2017-04-22T01:47:54+5:302017-04-22T01:47:54+5:30
तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली.
पैनगंगा कोरडी ठण्ण : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात असंतोष
उमरखेड : तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली. इसापूर धरणाचे पाणी सोडण्यातही आले. परंतु उंचवडद परिसरात अद्यापही पाणी पोहोचेल नाही. त्यामुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
उमरखेड तालुक्याच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी पात्रात पाणी असले की परिसरातील विहिरी आणि हापतपंपाची पाणी पातळी वाढते. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडली. त्यामुळे ४० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदीचे पाणी नदी पात्रात सोडावे यासाठी आंदोलने करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने १५ दलघमी पाणी राखीव ठेवले आहे. त्यातील ११ दलघमी नांदेडच्या कोट्यातील पाणी सोडण्यात आले. परंतु उंचवडद येथील परिसरासाठी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले नाही. पाण्यासाठी येथील नागरिकांनी पैनगंगा नदीच्या पात्रातच चार दिवस उपोषण केले. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. तीन दलघमी पाणी नदी पात्रात सोडल्यास या परिसराचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. परंतु अद्यापही प्रशासनाने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही.
विशेष म्हणजे विदर्भात हा प्रकल्प असला तरी मराठवाड्याला मात्र मुबलक पाणी मिळते. उन्हाळ्यातही असाच दुजाभाव होतो. दोन आठवड्यापूर्वी पैनगंगेचे सोडलेले पाणी मराठवाड्यातील नागरिकांनी अडविले होते. त्यानंतर तहसील प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बांध उद्ध्वस्त करण्यात आला. परंतु त्यानंतरही उंचवडदपर्यंत पाणीच पोहोचले नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी आश्वासन दिले. परंतु अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि पैनगंगेच्या पात्रात उंचवडद परिसरात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र कोणताही पवित्रा घेत नाही.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावरील गावांसोबतच इतर गावांमध्येही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. तर विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्याची अद्यापही प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे बंदी भागासह तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना पोहोचत आहे. अनेकदा भारनियमामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. उमरखेड तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)