इसापूरचे भूकंपमापक यंत्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:01 PM2019-06-22T22:01:26+5:302019-06-22T22:02:20+5:30
पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र आणि प्रयोगशाळा बंद आहे.
नंदकिशोर बंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंबाळपिंपरी : पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र आणि प्रयोगशाळा बंद आहे.
लगतच्या उमरखेड व महागाव तालुक्यात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. विदर्भ - मराठवाडा सीमेवरील इसापूर धरण परिसरात ही गावे येतात. इसापूर धरणावर १९९० मध्ये पाटबंधारे विभागाने भूकंपमापक यंत्रणा उभारली होती. त्यावेळी पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. तेथे एक वास्तू बांधली. त्यात भूकंपमापक यंत्र बसविले. हे यंत्र थेट जपानमधून आणण्यात आले होते. भारतासह जगातील भूकंपाच्या नोंदी या यंत्रावर घेतल्या जात होत्या. जगात कुठेही भूकंप झाला तरी त्याची नोंद केली जात होती. भूकंपाचा केंद्रबिंदू, तीव्रता आदींची नोंद होत होती. २४ तास सुरू राहणाऱ्या या यंत्रावर दररोज सकाळी विशिष्ट कागद लाऊन माहिती घेतली जात होती. त्यासाठी तज्ज्ञ कर्मचाºयाची नियुक्ती होती.
जपान, इंडोनेशिया आणि गुजरातमधील भूज तसेच कोयना व बीड जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची नोंद येथील यंत्राने घेतली होती. त्याचप्रमाणे मुदखेड येथील भूकंपाची नोंदही झाली होती. पुणे येथील भूकंपमापक यंत्राच्या तोडीचे हे यंत्र आहे. विदर्भात एकमेव असलेल्या या यंत्राकडे गेल्या १५ वर्षांपासून दुर्लक्ष झाले. १५ वर्षांपूर्वी हे यंत्र अचानक बिघडले. दुरुस्तीसाठी ते नाशिकला पाठविले. त्यावेळी केवळ १५ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र त्याकडे जलसंपदा विभागाने लक्षच दिले नाही. त्यानंतर पाच-सात वर्षांपूर्वी येथील प्रयोगशाळेत चोरी झाली. त्यात १२ लाख रुपये किमतीची यंत्रणा चोरीस गेली होती. त्या चोरीचाही अद्याप थांगपत्ता लागला नाही. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र व प्रयोगशाळा ठप्प झाली आहे. परिणामी शुक्रवारी रात्री जिल्ह्याला बसलेल्या भूकंपाची नोंद येथे होऊ शकली नाही.
नवीन इमारत बांधून तयार
इसापूर धरण येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रयोगशाळेची जुनी वास्तू मोडकळीस आली होती. त्यामुळे तेथे १५ लाख रुपये खर्च करून नवीन वास्तू बांधण्यात आली आहे. या वास्तूमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र अद्याप भूकंपमापक यंत्राची प्रतीक्षा आहे.
भूकंपमापक यंत्र बसविण्याबाबत नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च इंस्टिट्यूटकडे (मेरी) दोन - तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. ‘मेरी’कडे त्यासाठी रक्कमही सुपूर्द केली. आता तांत्रिक अडचणी दूर होताच येत्या दोन - तीन महिन्यात नवीन वास्तूमध्ये यंत्र बसविण्यात येईल.
- व्ही. के. कुरूंदकर
कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरण