निवडणुकीतील गर्दीला कोरोनाची बाधा नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:14+5:30
गर्दी टाळण्यासाठी शासकीयस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीयादेखील सुरू आहे. याप्रक्रीयेदरम्यान, तहसील कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील गर्दीला कोरोनाची बाधा होणार नाही का, असा चिंता व्यक्त करणारा प्रश्न सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : संपूर्ण जगात कोरोना या आजाराची दहशत पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, गर्दी टाळण्यासाठी शासकीयस्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीयादेखील सुरू आहे. याप्रक्रीयेदरम्यान, तहसील कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील गर्दीला कोरोनाची बाधा होणार नाही का, असा चिंता व्यक्त करणारा प्रश्न सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही तहसीलदारांनी यासंदर्भात निवडणूक विभागाला पत्र लिहून या विषयात मार्गदर्शन मागितले असले तरी अद्याप निवडणूक विभागाने या पत्रांवर कोणताही अभिप्राय दिलेला नाही. देशभरात सध्या कोरोनाचे भय निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही दोन रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. वणी शहरातही काळजी घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वणी शहर व परिसरातील संपूर्ण शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील चित्रपटगृहे मोठे मॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘बॅन’ लावण्यात आले आहे.
कार्यक्रमांना दिलेल्या परवानग्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे अशा पद्धतीने गर्दी टाळली जात असताना, दुसरीकडे मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. यामुळे तहसील परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही का? असा नागरिकांचा सवाल आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी वणी तहसील परिसरात मोठी गर्दी दिसून आली. ३१ मार्चला मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. मतदान तसेच मतमोजणीच्यावेळीदेखील वणीत मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येणार आहेत.
पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाची सूचना
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी १७ ते ३१ मार्चपर्यंत टिपेश्वर अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव)सुभाष पुराणिक यांनी कळविले आहे.
वणीत तिघांना केले घरातच क्वारंटाईन
बँकांगवरून आलेले दोघे व मलेशियातून वणीत आलेल्या एकाने सोमवारी सकाळी स्वत:हून वणी ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासण्या करून घेतल्या. या तिघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे यांनी ‘लोकमत’ ला दिली. पुढील १४ दिवस सकाळ-सायंकाळी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातून किंवा विमान प्रवास करून आलेल्या कोणत्याही व्यक्तीने घाबरून न जाता वणी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार श्याम धनमने व डॉ.पोहे यांनी केले आहे.