पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:33 PM2018-11-27T23:33:35+5:302018-11-27T23:34:00+5:30

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला.

The issue of garbage outside the municipality hall | पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न

पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न

Next
ठळक मुद्देकाळे झेंडे दाखविले : यवतमाळ नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या अनागोंदीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. तर एका नगरसेवकाने चक्क आपल्या प्रभागातील कचरा घंटागाडीत आणून थेट पालिकेसमोरच रिचविला. त्यामुळे पालिकेची सभा सभागृहाबाहेर वादळी ठरली.
मंगळवारी यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा होती. सभेत भूमीगत गटार, कचरा आणि इतर महत्त्वाचे विषय चर्चेला असताना मुख्याधिकारी अनिल अडागळे अनुपस्थित होते. त्यामुळे नगरसेवक भडकले. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत प्रहारने सभेवर बहिष्कार टाकला. तर सभागृहातील सदस्यांनी विषयपत्रिकेत असलेल्या आठही विषयांना मंजुरी दिली. तर दुसरीकडे विरोधकांनी सभागृहाबाहेर काळे झेंडे दाखविले आणि कचरा भरलेली घंटागाडी रिती केली.
अमृत योजनेतील भूमीगत गटार योजनेसाठी आलेल्या जादा दराच्या निविदेला मंगळवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी संमती दर्शविली. सभागृहात या ठरावाला मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या या अफलातून कारभाराविरोधात आवाज उठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
संपूर्ण शहरासह हद्दवाढ क्षेत्रातही कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असतानाही कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेने आणलेली वाहने धुळखात पडून आहे. राजकारणाच्या श्रेयवादातून दिवाळीला या वाहनांचे उद्घाटन घेण्यात आले. विरोधीपक्षाच्या नगरसेवकांना याची कुठलीही माहिती दिली गेली नाही. इतकेच नव्हेतर, या वाहनांना आरटीओ कार्यालयाने दंड ठोठावला आहे. नगरपालिकेला तो भरावा लागणार आहे. हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे गटनेते चंदू चौधरी, नगरसेवक बबलू देशमुख, वैशाली सवई, पंकज मुंदे, दिनेश गोगरकर, रजनी देवकते यांनी काळे झेंडे दाखविले. यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला.

प्रभागातला कचरा पालिकेपुढे रिचविला
प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुुरे यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवित आपल्या प्रभागातील कचराच नगरपरिषदेच्या समोर आणून टाकला. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात रोष व्यक्त केला. तर सर्व नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली.

Web Title: The issue of garbage outside the municipality hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.