दहा राष्ट्रीयकृत बँकांना नोटीस जारी
By admin | Published: July 28, 2016 12:53 AM2016-07-28T00:53:40+5:302016-07-28T00:53:40+5:30
कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या दहा राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून बँकांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे
जिल्हाधिकारी : पीक कर्ज वाटपात हयगय
यवतमाळ : कर्ज वाटपात हयगय करणाऱ्या दहा राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून बँकांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. कर्ज वाटपाबाबत जिल्हा पातळीवर आढावा घेण्याची सूचना दिली आहे.
जिल्ह्यातील बँकांना १७३६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिले होते. प्रत्यक्षात बँकांनी ९०३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले. या कर्ज वितरणात सर्वात मोठा वाटा जिल्हा बँकेचा आहे तर राष्ट्रीयकृत बँका यामध्ये माघारल्या आहेत. कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दर १५ दिवसाला आढावा घेणे सुरू केले आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी बँकांनी उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर अर्ज द्या, कर्ज घ्या योजना राबविण्यात आली. त्यानंतरही शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही.
कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका चक्क नकार देत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानत नाही. यामुळे बँकांना कर्ज वाटायचे नाही का, असा प्रश्न करीत या बँकांच्या वरिष्ठ कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. तसेच बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे थेट तक्रार नोंदविली आहे. ३१ आॅगस्ट ही कर्ज वाटपाची अंतिम तारीख असून गत दोन महिन्यात या बँकांनी आपले उद्दीष्ट पाच टक्क्यावरून २० पर्यंत पोहोचविले आहे. अद्यापही काही बँकांचे ९० टक्के तर काही बँकांचे ६० टक्के उद्दीष्ट पूर्ण व्हायचे आहे. (शहर वार्ताहर)
कर्ज वाटपात माघारलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना सूचना देण्यात आली. व्यवस्थापकीय संचालकांना बँकांच्या कामकाजाची माहिती दिली. आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले.
- सचिंद्र प्रताप सिंह
जिल्हाधिकारी