शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:07 PM2018-09-21T22:07:59+5:302018-09-21T22:09:28+5:30
शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही तुच्छतेचाच आहे. आम्ही जी स्वच्छता करतो त्यामुळेच समाज निरोगी आणि सुदृढ राहण्यास मोलाचा हातभार लागतो. मात्र यानंतरही समाजात श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. स्वच्छतेची कामे करणे गैर आहे का? असा सवाल यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षक लता प्रताप गोंधळे यांनी समाजाला विचारला आहे.
शनिवारच्या श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक लता गोंधळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
समाजाचा सफाई कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिवसभर स्वच्छता करायची आणि घरी आल्यावर पुन्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच काम महिला सफाई कामगार अविरत पार पडतात. हे कार्य अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. सेवानगर हा सफाई कामगारांचा परिसर म्हणूनच ओळखला जातो. हा परिसर कामगार मेहनत करून स्वच्छ ठेवतात. मात्र शासकीय योजनांचा लाभ अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. या परिसरात २००१ मध्ये बांधलेले समाज भवन अजूनही अर्धवट अवस्थेतच आहे. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला हक्काची जागाच उपलब्ध होत नाही.
लताताई या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांचे वडील सफाई कामगार होते. त्या सासरी आल्यानंतर सफाई कामगार म्हणून नगरपरिषदेत लागल्या. तब्बल १२ वर्षे त्यांनी सफाई कामगार म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शौचालयाची सफाई करणे, नाल्या साफ करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे असे काम केली. त्यानंतर त्यांची पर्यवेक्षक म्हणून निवड झाली. आता त्या प्रभारी आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत आहे. आजही त्या सफाईचे काम करतात. त्यांच्या हाताखाली ९० महिला स्वच्छतेचे काम करीत आहे. समाजात आजही स्वच्छतेची जागरुकता नाही. सार्वजनिक शौचालयात कितीही स्वच्छता केली तरी घाण हाते. त्याचे खापर सफाई कामगारांवर फोडले जाते.
श्रमिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण आजही तुच्छतेचाच : खंत
लता गोंधळे यांच्या २७ वर्षाच्या सेवेत त्यांनी समाजातील तुच्छतेचा भाव जवळून पाहिला. त्या म्हणाल्या, पूर्वी आमच्या हातचे पाणी कोणी पित नव्हते, सार्वजनिक कार्यक्रमातही निमंत्रण राहत नव्हते. काळानुसार हा प्रकार ८० टक्के कमी झाला. मात्र तरीही आजही स्वच्छतेच्या कामावर जाणाऱ्या महिलांकडे समाज तुच्छतेने पाहतो, अशी खंत व्यक्त करताना ही स्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्वांकडे समानतेच्या नजरेने पाहिले तरच समाजाचा विकास शक्य होणार आहे. शिक्षित पिढी आजही साफसफाईचे काम करते, याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.