क्राईम ब्रॅंच, इन्टेलिजन्समध्ये ‘एक्सपर्ट’चीच नियुक्ती बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:00 AM2020-11-03T07:00:00+5:302020-11-03T07:00:02+5:30
Police Yawatmal News क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा (गोपनीय) या महत्वाच्या ठिकाणी संबंधित प्रशिक्षित व अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचीच नियुक्ती करण्याचे बंधन पोलीस महासंचालक कार्यालयाने घालून दिलेले आहे.
राजेश निस्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा (गोपनीय) या महत्वाच्या ठिकाणी संबंधित प्रशिक्षित व अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचीच नियुक्ती करण्याचे बंधन पोलीस महासंचालक कार्यालयाने घालून दिलेले आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक पोलीस घटक प्रमुख महासंचालकांच्या या निर्देशांकडे डोळेझाक करून उपरोक्त महत्वाच्या शाखांमध्ये राजकीय शिफारसींवर आलेले, वसुलीतील एक्सपर्ट, जी हुजरी करणारे व मर्जीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत असल्याचे प्रकार सर्रास पहायला मिळतात.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १६ ऑक्टोबर २०१४ रोजी या नियुक्त्यांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. आयुक्तालयात क्राईम ब्रॅंच, विशेष शाखा, जिल्हा पाेलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा विशेष शाखा येथे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याचे बंधन घालून देण्यात आले. गुन्हे शाखेत नेमणूक करताना संबंधिताला गुन्हे अन्वेषणाचा अनुभव आहे का, त्याने प्रशिक्षण विद्यालयातून गुन्हा अन्वेषणाचे प्रशिक्षण घेतले आहे का याची खात्री करावी, विशेष शाखेत नेमताना संबंधिताने पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता ( ईन्टेलिजन्स) प्रबोधिनीमध्ये गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे काय, हे तपासण्याचे निर्देश दिले गेले आहेत. प्रशिक्षण व अनुभवाशिवाय नियुक्त्या होत असल्याचे आढळल्यानेच ही मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली होती. मात्र आजही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे बहुतांश चित्र आहे. अनुभव नसलेल्या व प्रशिक्षण न घेतलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्राईम ब्रॅंच, विशेष शाखेत नेमणूक करू नये असे स्पष्ट आदेश बजावले गेले होते.
वेगळ्याच अनुभवांचे लागतात निकष !
प्रशिक्षण पूर्ण केलेेेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नोंदी त्यांच्या सेवा अभिलेख्यात न चुकता घेण्याचे निर्देशही दिले गेले. मात्र या बहुतांश निर्देशांकडे दुर्लक्ष करून क्राईम ब्रॅंच व विशेष शाखेत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोईने नियुक्त्या केल्या जात आहेत. या नियुक्त्यांसाठी महासंचालकांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांऐवजी वसुली, सरबराई, सेवेकरी, राजकीय हितसंबंध, जी हुजरी यालाच काही घटक पोलीस प्रमुखांकडून अधिक महत्व दिले जात असल्याचे आढळून येते.