‘तो’ अपघात नसून खून
By admin | Published: July 21, 2016 12:08 AM2016-07-21T00:08:46+5:302016-07-21T00:08:46+5:30
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राळेगाव रोडवरील इंदिरा महाविद्यालयाजवळ एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
दोघे ताब्यात : भावानेच केला खून
कळंब : सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राळेगाव रोडवरील इंदिरा महाविद्यालयाजवळ एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वाहन चालकावर गुन्हाही नोंद करण्यात आला. परंतु हा अपघात नसून खुनच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे क्षुल्लक कारणातून चुलत भावानेच हा खून केल्याचेही स्पष्ट झाले असून पोलिसांनी मुख्य आरोपी व आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील बोरीमहल येथील अजय माणीक खैरकार(२४) असे मृतकाचे नाव आहे. तो रामटेक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अजय खैरकार याचा चुलतभाऊ रणजित खैरकार याने वाहनाने अजयला धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु मृतक अजयची आई निर्मला यांनी हा अपघात नसून मुलाचा खून असल्याची तक्रार दिली. तक्रारीतून त्यांनी रणजित अण्णाजी खैरकार, अनिकेत दीपक गायकवाड व त्यांच्या नात्यातील एका महिलेवर संशय व्यक्त केला.
त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान रणजित खैरकार (३०) व अनीकेत गायकवाड (२२) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रणजीत खैरकार याने गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिकेत गायकवाड याने रणजितनेच अजय खैरकार याला रागाच्या भरात लोखंडी रॉड मारल्याची माहिती पोलिसांना दिली. अजय खैरकार व रणजित खैरकार हे दोघे चुलतभाऊ होते. घटनेच्या दिवशी या तिघांनीही कळंब येथील बीअरबार मध्ये दारु ढोसली. रात्री ९ वाजताच्या दरम्यान मोटारसायकलने ट्रिपलसिट बोरीमहलकडे परतत असताना दोघा भावांत कॉटन मिलजवळ क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले आणि रॉड डोक्यात हाणला. एका दणक्यात तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याची माहिती पोलिसांना दिली. (तालुका प्रतिनिधी)