बुलडाण्यात शक्य आहे, तर यवतमाळात का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:04 PM2018-03-05T23:04:12+5:302018-03-05T23:04:12+5:30
लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय. पण ही स्थिती एकट्या यवतमाळातच आहे असे नाही. बुलडाणा जिल्हाही पाण्याविना तगमगतोय. तिथल्या माणसांनी आदळआपट करण्याऐवजी धरणं खोदायला सुरूवात केली आहे. भारतीय जैन संघटनेने त्यासाठी कंबर कसली. बुलडाण्यात सुरू झालेले हे भगीरथ प्रयत्न यवतमाळच्या माणसांनीही का करू नये, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुणाच्या पोटात काय आहे, हे जसे कळत नाही. तसे जमिनीच्या गर्भात पाणी आहे की नाही? हे कोण सांगणार? म्हणूनच आकाशातून पडणारे पाणी धरणात साठवून ठेवणे एवढेच आपल्या हाती असते. बुलडाण्यात भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) तोच वसा घेतला आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करणाºया बीजेएसने यंदा बुलडाणा जिल्ह्यापासून कामाला प्रारंभ केला. वर्षभरात जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी धरणांच्या खोलीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ४ कोटी क्यूबिक मिटर गाळ काढून किमान ५० हजार एकर जमीन सुपीक करायची आणि सुमारे २८ अब्ज लिटर पाणी साठवणक्षमता निर्माण करायची, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भारतीय जैन संघटनेने १३४ जेसीबी मशिन, पोकलॅन खरेदी केल्या आहेत.
आता हेच प्रयत्न यवतमाळात का नाही, हा प्रश्न खरा आहे. पाण्यासाठी यंदा आकांत सुरू होणार हे ठाऊक असूनही यवतमाळच्या एकाही संस्थेने धरणाच्या खोलीकरणाचा ‘प्रयास’ केला नाही. गेल्यावर्षी पाणी फाउंडेशनसोबत मिळून भारतीय जैन संघटनेने यवतमाळात मोठे काम केले होते. पण यंदा महाराष्ट्रव्यापी कामाची सुरुवात बीजेएसने बुलडाण्यातून केली आहे. बीजेएसकडे यंत्रसामुग्री आहे. इच्छाशक्तीही आहे. मग यवतमाळच्या अन्य सामाजिक संस्थांनी बीजेएसकडे मदत का मागू नये? प्रत्येक काम शासन आणि प्रशासनावरच लोटून सामान्य माणसाला जबाबदारी झटकता येणार नाही. गेल्यावेळी प्रयास संघटनेने निळोणा धरणातील गाळ उपसण्याचे महत्कार्य केले. पण वर्गणी आणि प्रशासकीय सहकार्याविना काम थांबले. तेच काम आता बीजेएसची मदत घेऊन सर्वसामान्य यवतमाळकरांनी सुरू केल्यास पुढची काही वर्षेतरी टंचाई दूर होईल.
बुलडाण्यात पाण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. मग यवतमाळातील सामाजिक संस्थांनी असा पुढाकार आतापर्यंत का घेतला नाही? संस्थाच कशाला, सामान्य नागरिकांनीही घराबाहेर पडून रचनात्मक कार्यात हातभार लावायला काय हरकत आहे? बुलडाणा करू शकते तर यवतमाळ का नाही? पाणी हवे असेल तर यावर विचार व्हायलाच हवा आणि कृतीही!
बेंबळाचे स्वप्न पाईपलाईनमध्येच
निळोणाने दगा दिल्यामुळे बेंबळा धरणाचे पाणी आणू, असे दिवास्वप्न गेल्या दोन महिन्यांपासून दाखविले जात आहे. मार्च उलटला तरी हे स्वप्न ‘पाईपलाईन’मध्येच अडकले आहे. आता पाण्याविना कासाविस झालेल्या नागरिकांचा धीर सुटू लागलेला आहे. परवा संतापाचा कडेलोट झाला आणि जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड झाली. ऐनवेळी धावून आलेल्या पोलिसांनी नागरिकांना समज दिली, पाणी नाही देऊ शकले. पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेले अधिकारी मात्र हवेच्या वेगाने लुप्त झाले.