‘स्वरानंदवन’ ठरला अविस्मरणीय

By admin | Published: February 19, 2017 12:38 AM2017-02-19T00:38:39+5:302017-02-19T00:38:39+5:30

शारीरिक अपंगांना दिला जाणारा करुणेचा सन्मान बदलणे ही काळाची गरज आहे. अपंगांना एका शिस्तबद्ध, रचनात्मक विचारसूत्रात गुंफले

It was unthinkable to become 'Swarandhanvan' | ‘स्वरानंदवन’ ठरला अविस्मरणीय

‘स्वरानंदवन’ ठरला अविस्मरणीय

Next

स्फूर्तीदायक उपक्रम : विविध कलागुणांचे सादरीकरण
काशीनाथ लाहोरे  यवतमाळ
शारीरिक अपंगांना दिला जाणारा करुणेचा सन्मान बदलणे ही काळाची गरज आहे. अपंगांना एका शिस्तबद्ध, रचनात्मक विचारसूत्रात गुंफले तर त्यांच्या संघटित क्षमता अनेकपटीने वाढतात. याचे स्वरानंदवन हे उत्तम उदाहरण आहे. समाजानेच समाजाच्या हितासाठी लढायला हवे, हा संदेश देणारा स्फुर्तीदायक उपक्रम आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळ अंतर्गत छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी येथील समता मैदानात स्वरानंदवन या स्वर संगीत रजनीचा कार्यक्रम घेण्यात आला. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संगीत व नृत्य अविष्कार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विचारपिठावर अशोक घारफळकर, सुषमा राऊत, पप्पू भोयर, प्रा.डॉ. संगीता घुईखेडकर, राजेंद्र घोंगडे, आशा तरोणे, डॉ. अनिल पटेल, डॉ. पी.डी. काळमेघ, प्रदीप साळवे, वैशाली सवाई आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे पुरस्काराने प्रांतीक विवेक देशमुख यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘मातीची कुस्ती’ या लघुपटाला पुरस्कार मिळाला आहे. हा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला. प्रास्ताविक प्रा. सुनील कडू यांनी केले. संचालन कैलास राऊत, आभार राजू भोयर यांनी मानले.
मूक-बधिरांच्या गणेशवंदनेने स्वरानंदवनचा प्रारंभ झाला. सुनीलकुमार याने महाराष्ट्र गीत सादर केले. विकलांगाच्या भावना व्यक्त करणारे गीत सोनू या कलावंताने सादर केले. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हा कुष्ठरोगमुक्त रुग्णांसाठीचा संदेश होता. पुरुषोत्तम चांदेकर आणि सोनू यांचे युगल गीत ‘जिंदगी हर कदम एक नयी जंग है’ सादर करण्यात आले. वेगवेगळ्या प्राण्यांची वेशभूषा केलेल्या कलावंतांनी आलिशा चिनॉयचे ‘मेड इन इंडिया’ सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. निसर्गत: गुडघ्याखाली पाय नसलेल्या गजानन भगत याने उत्तम नृत्य केले. हेमलकसामधील आदिवासी नृत्य, लावणी, वंदे मातरम्, पिंगा ग पोरी पिंगा आदी अनेकरंगी कलागुणांचा अविष्कार यावेळी पहावयास मिळाला. सदाशिव ताजने यांचे व्यवस्थापन, सुनील कदम यांचे हिंदी, मराठी उत्कृष्ट निवेदन, उत्तम कर्णमधूर संगीत, आकर्षक प्रकाश योजना असल्याने स्वरानंदवन कार्यक्रम अतिशय बहारदार आणि अविस्मरणीय ठरला. दिव्यांगाप्रती आदरभाव निर्माण करणारा हा संगीत उपक्रम यवतमाळकरांच्या चिरकाल स्मरणात राहणारा आहे.

१५० कलाकारांची चमू, देशभर १५०० कार्यक्रम
स्वरानंदवनच्या चमूने १५०० कार्यक्रम भारतभर करून शारीरिक अपंगत्व असणाऱ्या समाजात अभिमानाचे व हक्काचे स्थान मिळविण्याची प्रेरणा दिली आहे. १५० कलाकारांचा समावेश यात असून अधिकांश अंध, दिव्यांग, मूक-बधिर, रोगमुक्त कुष्ठरुग्ण आहेत. अत्याधुनिक वाद्यवृंद, रोषणाई, ध्वनी व्यवस्था, संस्थेची स्वत:ची वाहने या चमूजवळ आहे. निसर्गदत्त अपंगत्वावर मात करून ज्ञान आणि मनोरंजनाचा वसा घेतलेल्या या कलावंतांना अन्न, वस्त्र, निवारा आदी सर्व सुविधा महारोगी सेवा समितीद्वारा दिल्या जातात. स्वरानंदवनच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून ५०० घरांचे हिम्मतग्राम (कलाकारांचे ग्राम) शिक्षण प्रशिक्षण आणि पुनर्वसन आदी अद्यावत सुविधांसह उभारण्याचा डॉ. विकास आमटे यांचा संकल्प आहे.
 

Web Title: It was unthinkable to become 'Swarandhanvan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.