पाणी पुरवठा योजनेची जॅकवेल इमारत कोसळली, पांढरकवडा नगर परिषद : ५० वर्षांपूर्वीची जुनी होती योजना, सणासुदीत उद्भवली पाणी समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:46 AM2021-09-06T04:46:21+5:302021-09-06T04:46:21+5:30
रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजू केराम हे अस्थायी कर्मचारी पाणीपुरवठ्याचे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत ...
रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजू केराम हे अस्थायी कर्मचारी पाणीपुरवठ्याचे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत मोटारीचे स्वीच सुरू करून बाजूला जात नाही तोच अचानक पत्त्याच्या बिल्डिंग प्रमाणे जॅकवेलची ही इमारत क्षणात कोसळली. सुदैवाने केराम हे दोन फूट अंतरावर दूर असल्यामुळे ते थोडक्यात बचावले. ही माहिती शहरात कर्णोपकर्णी पसरताच घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमा झाली होती. नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. नगर परिषदेतर्फे शहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा योजना ही अतिशय जुनी आहे. १९७१ पासून ही योजना सुरू झाली. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी या गावाजवळ ५० वर्षांपूर्वी १९७० मध्ये जॅकवेलचे काम करण्यात आले. जॅकवेलची इमारत ही अतिशय जीर्ण झाली होती. नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने वेळीच लक्ष द्यायला पाहिजे होते. या ठिकाणीच पाण्याचे स्त्रोत असून खुनी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणावरून जॅकवेलद्वारे प्रथम शहरातील तीन पाण्याच्या टाक्या भरल्या जातात व तेथून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. जॅकवेल इमारतीमध्ये ३० अश्वशक्तीचे दोन व २० अश्वशक्तीचे दोन असे चार मोटर पंप बसविण्यात आले होते. ५० वर्षांपूर्वीची ही इमारत पूर्णतः जीर्ण झाली होती. केव्हा कोसळेल याची शाश्वती नव्हती. अखेर रविवारी ही इमारत कोसळली. त्यामुळे शहरात नियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याला बाधा येणार आहे.
बॉक्स : तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न
ज्या ठिकाणावरून संपूर्ण पांढरकवडा शहराला नियमित पाणीपुरवठा होत होता त्या ठिकाणावरील जॅकवेलची इमारत कोसळल्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या उदभवणार आहे. ही समस्या नगरपरिषदेला तातडीने सोडवावी लागणार आहे. खुनी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यास तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने सायखेडा सिंचन प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी नऊ किलोमीटर पाईपलाईन टाकली होती. त्यासाठी सायखेडा प्रकल्पात ३० अश्वशक्तीचे तीन मोटर पंप बसविण्यात आले होते. हे मोटर पंप आता तात्पुरते खुनी नदीवर बसवून शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला जोडण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.