अंगणवाडीतार्इंचे भरपावसात जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:27 AM2017-10-06T00:27:09+5:302017-10-06T00:27:24+5:30
मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले. भरपावसातही तार्इंनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली, तर आंदोलकांच्या मोठ्या संख्येने अटकेसाठी पोलिसांची वाहने अपुरी पडली. विविध घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.
मानधनवाढीचा मुद्दा घेऊन अंगणवाडीतार्इंच्या विविध संघटना संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरल्या आहे. ११ सप्टेंबरपासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. उलट अंगणवाडीचे कामकाज ग्रामपंचायत अथवा आशा स्वयंसेविकेकडे सोपविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अंगणवाडीताई दुपारी १२ वाजता बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. त्यानंतर संपूर्ण बसस्थानक चौकात अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पावसाची जोरदार सर कोसळली. परंतु एकही अंगणवाडीताई जागांवरून हटायला तयार नव्हती. पाऊस ओसरताच पोलिसांनी स्थानबद्धची कारवाई सुरू केली. मात्र दोनच लॉरी असल्याने स्थानबद्ध करण्यासाठी अनेक येरझारा माराव्या लागल्या. तोपर्यंत बसस्थानक चौकातील वाहतूक ठप्पच होती. आंदोलकांना स्थानबद्ध करण्यासाठी बराच वेळ गेला.
आंदोलनाचे नेतृत्व उषाताई डंभारे, गुलाब उम्रतकर, रचना जाधव, पल्लवी रामटेके, कांताबाई मोरे, जया सावळकर, प्रणिता राजूरकर, छाया दांडेकर, सविता कट्यारमल, अनिता कुळकर्णी, विजया सांगळे, रेखा लांडे, निर्मला मादेरकर, विजया जाधव, रमा गजभार, बेबी मोडक, दिवाकर नागापुरे, संजय भालेराव आदींनी केले.