यवतमाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भरपावसात जेलभरो आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 03:20 PM2017-10-05T15:20:31+5:302017-10-05T15:32:17+5:30
आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले.
यवतमाळ : आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले. भरपावसातही तार्इंनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली, तर आंदोलकांच्या मोठ्या संख्येने अटकेसाठी पोलिसांची वाहने अपुरी पडली. विविध घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.
मानधनवाढीचा मुद्दा घेऊन अंगणवाडीतार्इंच्या विविध संघटना संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरल्या आहे. ११ सप्टेंबरपासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. उलट अंगणवाडीचे कामकाज ग्रामपंचायत अथवा आशा स्वयंसेविकेकडे सोपविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अंगणवाडीताई दुपारी १२ वाजता बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. त्यानंतर संपूर्ण बसस्थानक चौकात अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पावसाची जोरदार सर कोसळली. परंतु एकही अंगणवाडीताई जागांवरून हटायला तयार नव्हती. भरपावसात आंदोलन सुरू ठेवून शासनविरोधी घोषणा देत होत्या. पाऊस ओसरताच पोलिसांनी अंगणवाडीतार्इंना स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली. मात्र दोनच लॉरी असल्याने स्थानबद्ध करण्यासाठी अनेक येरझारा माराव्या लागल्या. तोपर्यंत बसस्थानक चौकातील वाहतूक ठप्पच होती. मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना स्थानबद्ध करण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ गेला.
आंदोलनाचे नेतृत्व उषाताई डंभारे, गुलाब उम्रतकर, रचना जाधव, पल्लवी रामटेके, कांताबाई मोरे, जया सावळकर, प्रणिता राजूरकर, छाया दांडेकर, सविता कट्यारमल, अनिता कुळकर्णी, विजया सांगळे, रेखा लांडे, निर्मला निर्मला मादेरकर, विजया जाधव, रमा गजभार, बेबी मोडक, दिवाकर नागापुरे, संजय भालेराव आदींनी केले.