अडलेल्यांना पाय, थांबलेल्यांना देऊ हात; बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त जयपूर फूट शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:48 AM2023-04-03T11:48:51+5:302023-04-03T11:50:26+5:30

मोफत जयपूर फूट शिबिराला प्रतिसाद

Jaipur Foot donation to divyang people on the occasion of freedom fighter Jawaharlal Darda birth centenary | अडलेल्यांना पाय, थांबलेल्यांना देऊ हात; बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त जयपूर फूट शिबिर

अडलेल्यांना पाय, थांबलेल्यांना देऊ हात; बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त जयपूर फूट शिबिर

googlenewsNext

यवतमाळ : समाजातील शोषित, वंचितांसाठी आयुष्यभर लढा देणारे बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्षही संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्यातूनच साजरे केले जात आहे. त्याच सामाजिक उपक्रमांच्या श्रृंखलेचा एक भाग म्हणून रविवारी, २ एप्रिल रोजी यवतमाळ येथे दिव्यांग व्यक्तींना पुणे येथील साधू वासवानी मिशनच्या वतीने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्याचे शिबिर पार पडले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात सकाळी १० वाजता शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश जतकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, साधू वासवानी मिशनचे प्रकल्प अधिकारी डॉ.मिलिंद जाधव, डॉ.सलील जैन, डॉ.राहुल सरोज, डॉ.जितेंद्र राठोड, डॉ.ज्ञानेश्वर पाटील, सुशील ढगे, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा, रेडक्रॉस सोसायटीचे सचिव जलालुद्दीन गिलाणी, डाॅ.लव किशोर दर्डा, लाेकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मेहमूद नाथानी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी केवळ यवतमाळच नव्हे, तर चंद्रपूर, नागपूर, अमरावती, वाशिम, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातूनही अनेक दिव्यांग बांधव हजर झाले होते. शिबिराच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांगांच्या अर्धवट अवयवांची मोजणी करून घेतली. साधू वासवानी मिशनमार्फत हे कार्य पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत या शिबिरात १७६ दिव्यांग बांधवांची नोंदणी झाली. आता तीन आठवडे ते एक महिना कालावधीनंतर या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव (जयपूर फूट) बसवून दिले जाणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे अडखळत चालावे लागणाऱ्या दिव्यांगांना नव्या उमेदीचे पंख लाभणार आहेत. उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी दिव्यांग लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांनी केले.

सामाजिक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य : अमोल येडगे

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय बसवून देण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यासाठी संपूर्ण लोकमत परिवाराचे अभिनंदन. कोविडच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारचे मोठे शिबिर कुठेच आयोजित होऊ शकले नाही. मात्र, आता या शिबिरामुळे अनेक दिव्यांगांना फायदा होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर रविवारचा दिवस असूनही शिबिरासाठी उपस्थित झाले. त्यामुळे त्यांचेही आभार. लोकमतने यापुढेही असे सामाजिक उपक्रम जास्तीतजास्त राबवावे, सामाजिक उपक्रमांना जिल्हा प्रशासनाचे सहकार्य राहील, त्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल.

अपघात टाळा, अपंगत्व टळेल - डॉ.पवन बन्सोड

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड म्हणाले, शिबिरात आलेल्या बहुतांश तरुणांचे पाय अपघातामुळे गेल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे, तर काहींच्या पायांना डायबिटीजमुळे अपंगत्व आले आहे. या बाबींवरून जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गाडी चालविताना प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे. रस्त्यावर नियम पाळल्यास अशी परिस्थिती उद्भवणार नाही. लोकमतने आज या शिबिराच्या माध्यमातून जे पुण्याचे काम हाती घेतले आहे, त्याचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा. काही दिव्यांगांकडे पूर्वीचेच कॅलिपर्स दिसतात. त्याचा त्रास असल्यास साधू वासवानी मिशनच्या तज्ज्ञांशी संवाद साधावा.

दिव्यांगांनी कॅलिपर्सचा सदुपयोग करावा - किशोर दर्डा

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमांद्वारे साजरे होत आहे. राजकीय, पत्रकारिता, संगीत अशा विविध विषयांशी निगडित कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच यवतमाळात तीन दिवसीय संगीत महोत्सव झाला. त्यावेळी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाचेही सहकार्य लाभले. कृत्रिम हात-पाय बसविण्याच्या या शिबिरात दिव्यांगांनी नि:संकोचपणे तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधावा. या शिबिरातून मिळणाऱ्या कृत्रिम हाता-पायांचा (कॅलिपर्स) लाभार्थ्यांनी सदुपयोग करावा.

Web Title: Jaipur Foot donation to divyang people on the occasion of freedom fighter Jawaharlal Darda birth centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.