जळगावचे चोपडा बसस्थानक राज्यात सर्वात स्वच्छ, सुंदर; अभियानात पहिले, ब वर्गात भंडाऱ्यातील साकोली अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:17 AM2024-06-27T05:17:10+5:302024-06-27T05:17:18+5:30

पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले.

Jalgaon's Chopra bus stand is the cleanest, most beautiful in the state First in Abhiyaan, Sakoli in Bhandara is the top in class B | जळगावचे चोपडा बसस्थानक राज्यात सर्वात स्वच्छ, सुंदर; अभियानात पहिले, ब वर्गात भंडाऱ्यातील साकोली अव्वल

जळगावचे चोपडा बसस्थानक राज्यात सर्वात स्वच्छ, सुंदर; अभियानात पहिले, ब वर्गात भंडाऱ्यातील साकोली अव्वल

यवतमाळ: एसटी महामंडळाने घेतलेल्या " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत 'अ' वर्गामध्ये राज्यात जळगावं  जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला. या बसस्थानकाला ५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. या अभियानांतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.२५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच 'क' वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.१० लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १मे,२०२३ ते ३० एप्रिल,२०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान " राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच  प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात  आली आहे.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील  प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी  निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.    या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले. या अभियानातून "आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक" ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रूजविण्यास मदत झाली आहे. असे  प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Web Title: Jalgaon's Chopra bus stand is the cleanest, most beautiful in the state First in Abhiyaan, Sakoli in Bhandara is the top in class B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.