मारेगावात 'जलजीवन'ची कामे रखडली; येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:35 PM2024-11-21T18:35:59+5:302024-11-21T18:36:50+5:30
Yavatmal : उन्हाळ्यात पाणी आणणार कोठून?, कंत्राटदाराची अनास्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यातील अनेक गावांतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेची कामे दोन वर्षांपासून रखडून पडली आहे. तेव्हा येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नळयोजनेचे काम लवकरात लवकर उरकून घेणे आवश्यक असताना कंत्राटदाराला मात्र लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, असे दिसते.
ग्रामस्थांना शुद्ध पाणी घरपोच मिळावे, यासाठी जलजीवन योजनेअंतर्गत नळ योजनेचे कामे तालुक्यात सुरू करण्यात आली. जलयोजनेचा उद्देश चांगला असला तरी कंत्राटदाराची मात्र नळयोजनेच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश भागात नळयोजनेसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत; परंतु, नंतर ते दुरुस्तही करून दिले नाहीत.
त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील धामणी येथील योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी नळयोजनेचे काम सुरू करण्यात आले. गावातील रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. टाकी बांधकाम पूर्ण केले गेले. मात्र टाकीत येणाऱ्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या विहिरीचे काम अद्यापही सुरू केले नाही. पाणी नसताना रस्ते खोदून नळ योजनेचे पाइप टाकणे आणि टाकीचे बांधकाम कशासाठी केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहे. कमिशन खायला ही योजना सुरू केली काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
आता डिसेंबरनंतर या गावात पाणीटंचाईला सुरुवात होते. त्यामुळे पाणीटंचाई सुरू होण्यापूर्वी ही अपुरे कामे पूर्ण करून पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी अपुरे बांधकाम असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे. अपुरी ठेवण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी तालुकयातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
"धामणी येथे टाकीचे व पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. गावात विहिरीसाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे याठिकाणी ट्यूबवेल करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच नळ योजना कार्यान्वित करण्यात येईल."
- प्रफुल्ल चिंतकुंटलवार, अभियंता जलजीवन मिशन.
"जलजीवन योजनेअंतर्गत धामणी गावातील रस्ते खोदून ठेवले आहेत; परंतु नळयोजनेचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. उन्हाळ्यापूर्वी पाण्याची व्यवस्था करावी एवढीच मागणी आहे."
- धर्माजी मरस्कोल्हे, नागरिक.
"दोन वर्षांपूर्वी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे टाकीचे काम 'जैसे थे' आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नळाला पाणी येईल की नाही? याबाबत शंकाच आहे. अशा परिस्थितीत कंत्राटदार का लक्ष देत नाहीत, हेच कळायला मार्ग नाही."
- श्रीकांत क्षीरसागर, नागरिक.