जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:51 IST2024-07-13T18:50:12+5:302024-07-13T18:51:33+5:30
Yavatmal : चौकशी अहवालानंतरही कारवाई थंडबस्त्यात

Jaljivan Mission - Irregularities in work
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : आनंदनगर येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाली आहे. या प्रकरणात गावकऱ्यांच्या तक्रारीवर चौकशी समिती नेमून अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
जलजीवनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सीमा वानखेडे, देवीदास राठोड, विनायक भारती, विशाल रोकडे, अर्जुन - कदम, सचिन आगरकर, करण - आगरकर, सतीश गावंडे, अजय कदम आदींनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे राळेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता संजय गेडाम - यांच्या नेतृत्वात समिती गठित केली. यानुसार प्रत्यक्ष कामावर चौकशी करण्यात आली. वैयक्तिक नळ जोडणी आणि पाइपलाइनच्या कामावर अंदाजपत्रकानुसार नऊ लाख २६ हजार दोनशे रुपये खर्च अपेक्षित होता.
१५ सप्टेंबर २०२२ रोजी काम पूर्ण झाल्याचा अहवाल देण्यात आला. यावर एकूण सात लाख सात हजार तीनशे पाच रुपये खर्च एमबी दर्शवण्यात आला. या प्रकरणी सरपंच, सचिवांना बडतर्फ करण्याची मागणी आहे. समितीचे संजय गेडाम, पंजाब रणमले, उमेश गोरडे आदींच्या सह्यानिशी अहवाल सादर करण्यात आला. परंतु, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
"चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. कार्यवाहीचे अधिकार वरिष्ठांना आहे."
- डी.एच. टाकरस गटविकास अधिकारी, महागाव.