जळका-धानोरा गटात प्रतिष्ठेची लढत
By admin | Published: February 13, 2017 01:21 AM2017-02-13T01:21:55+5:302017-02-13T01:21:55+5:30
नगरपंचायत झाल्याने नवनिर्मित जळका जिल्हा परिषद गटात तीनही प्रमुख पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.
तूल्यबळ उमेदवार : काँग्रेस, भाजप, सेनेची प्रतिष्ठा पणाला, नवीन जिल्हा परिषद गट
राळेगाव : नगरपंचायत झाल्याने नवनिर्मित जळका जिल्हा परिषद गटात तीनही प्रमुख पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड. सीमा तेलंगे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांनी याआधी वरध जिल्हा परिषद गटातून विजय मिळविला आहे. जळका हा गट त्यांच्यासाठी नवा असला तरी आपण राबविलेल्या विकास कामांचा पाढा वाचत त्या मताचा जोगवा मागत आहे. सोबतच जळका पंचायत समिती गणातून नलिनी पराते, धानोरा गणातून मंगला ठाकरे या खिंड लढवित आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके आणि काँग्रेस नेत्यांची फौज गट पिंजून काढत आहे.
यापूर्वी सदर गटामध्ये राळेगाव शहर होते. मिलिंद धुर्वे यांच्या रूपाने जिल्हा परिषद सदस्य होते. काँग्रेस व भाजपाला या गटातून विजय मिळविता आला नव्हता. आता दोनही प्रमुख पक्षांनी या गटावर दावा करताना संपूर्ण विकासाचा पाढा वाचणे सुरू केले आहे. भाजपाने उषा बाबाराव भोयर यांना उमेदवारी दिली आहे. याआधी त्यांनी राळेगाव गट असताना निवडणूक लढविली होती. हेवीवेट उमेदवार असा त्यांचा परिचय आहे. भाजपाने त्यांना सहा महिन्यांपूर्वीच उमेदवारी बहाल केली होती. त्यांच्या समवेत धानोरा गणातून स्नेहा विजय येनोरकर व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या सक्षम उमेदवाराची साथ तसेच जळका गणातून सरपंच मारोती सलाम यांच्या पत्नी शीला सलाम यांना उमेदवारी दिल्याने सक्षम महिला उमेदवारांची टीम त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेने या मतदारसंघासाठी प्रगतशील शेतकरी प्रकाशराव देशमुख यांच्या पत्नी ज्योती प्रकाशराव कुलकर्णी यांना उमेदवारी देवून मतदारसंघात तगडे आव्हान उभे केले आहे. देशमुख यांचा या परिसरात दबदबा आहे. सामाजिक भूमिका, शिवसैनिकांची साथ तसेच जळका गणातून अलका धुर्वे, धानोरा गणातून माधुरी सुरेंद्र भटकर या उमेदवारांचीही त्यांना साथ मिळत आहे. सेनेला येथे मोठ्या अपेक्षा आहे.