धगधगता निखारा जांबुवंतराव
By admin | Published: February 19, 2017 12:49 AM2017-02-19T00:49:46+5:302017-02-19T00:49:46+5:30
लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे,
स्वतंत्र विदर्भ राज्याचा खंदा समर्थक हरविला
यवतमाळ : लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर. जाळीचे बनियान आणि तितकाच पांढरा स्वच्छ कुर्ता. हातात कडे, केसांची जटा, दाढी आणि चेहऱ्यावर धगधगत्या निखाऱ्यापेक्षा प्रखर अन्यायाची चीड घेऊन भाऊ जांबुवंतराव धोटे भाषणासाठी उभे राहायचे. लाखोंच्या जनसमुदायाला ते पेटवून उठवायचे. त्यांच्या एका शब्दावर अवघ्या २४ तासात लाखो माणसे मोर्चात यायची. अख्खा महाराष्ट्र आपल्या दोन्ही हातांनी खदखदा हलवून सोडायचे. शेकडो आंदोलनांचे नेतृत्व करणारे भाऊ जांबुवंतराव धोटे म्हणजे एकेकाळी तरुणांच्या गळ्यातील ताईत होते.
भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा मोर्चा असला की, लाखो लोक धावून यायचे. प्रत्येक मोर्चात ते मोर्चेकऱ्यांसोबत शेवटपर्यंत चालायचे. हातावरच भाकरी खायचे आणि भाषणासाठी उभे राहिले की अन्यायाविरुद्ध अंगार ओतायचे. त्यांच्या भाषणाने त्याकाळी तरुण पेटून उठायचे. जांबुवंतराव म्हणजे एक विलक्षण रसायन होते. कृषी विद्यापीठासाठी त्यांनी केलेले आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला एक कृषी विद्यापीठ देण्याची घोषणा केली. कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावे, अशी मागणी धोटे यांनी केली होती. परंतु त्याला तत्कालीन राज्य सरकारने विरोध केला. त्याच वेळी जांबुवंतरावांनी जोपर्यंत विदर्भाला कृषी विद्यापीठ मिळणार नाही तोपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. त्यानंतर तडक अकोला गाठून त्यांनी उपोषण सुरू केले. ठिकठिकाणी आंदोलन पेटले. अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. त्यात पाच जण ठार झाले. शेवटी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
केवळ कृषी विद्यापीठासाठी पाच जणांचे बळी द्यावे लागले, त्यापेक्षा आपल्या विदर्भाचे स्वतंत्र राज्यच का नको असे म्हणत त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी चळवळ उभारली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे यांनी अनेक कीर्तीमान स्थापित केले. लाखो लोकांच्या सभा घेतल्या. अनेकांच्या सभा उधळून लावल्या. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाचे गाजर दाखविले. परंतु भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या हयातीत विदर्भ राज्य होऊ शकले नाही. गेल्याच आठवड्यात भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विदर्भ राज्य द्रोह्यांना मतदान करू नका, असे आवाहन केले होते.