जवाहरलाल दर्डा २१ वा स्मृती समारोह : संगीत-साहित्याची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:40 PM2018-11-19T13:40:00+5:302018-11-19T13:41:51+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Jawaharlal Darda 21st Memorial Festival: Music-Literature Festival | जवाहरलाल दर्डा २१ वा स्मृती समारोह : संगीत-साहित्याची मेजवानी

जवाहरलाल दर्डा २१ वा स्मृती समारोह : संगीत-साहित्याची मेजवानी

Next
ठळक मुद्देकुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले राहुल देशपांडे यांची मैफल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले ख्यातकीर्त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मैफल शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आयोजित करण्यात आली आहे.
बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त मागील वर्षी यवतमाळच्या रसिकांना ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यांतून लोकप्रिय झालेल्या महेश काळे यांचे गायन अनुभवता आले. यंदा याच चित्रपटासाठी स्वर देणारे दुसरे महत्त्वाचे गायक राहुल देशपांडे यांची स्वरांजली होत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या खाँ साहेब आफताब हुसेन बरेलीवाले या मध्यवर्ती पात्रासाठी राहुल देशपांडे यांनी पार्श्वगायन केले. विशेष म्हणजे, चित्रपटापूर्वी ‘कट्यार काळजात घुसली’ हे कथानक नाट्यरूपात रंगमंचावर सादर झाले. त्यावेळी खाँ साहेबांची भूमिका स्वत: राहुल देशपांडे यांनीच दमदारपणे साकार केली होती. आता तेच स्वर साक्षात यवतमाळकरांना ऐकता येणार आहे.
राहुल देशपांडे दरवर्षी आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वसंतोत्सव’ आयोजित करून रसिकांना अस्सल गायकीची मेजवाणी देतात. ‘संगीत मानापमान’ या प्रसिद्ध संगीत नाटकाची राहुल देशपांडे यांनी नव्या स्वरूपातील आवृत्ती साकारली असून पूर्वीच्या ५२ ऐवजी २२ शास्त्रीय गीतांचा समावेश केला आहे. शिवाय ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातूनही त्यांनी शास्त्रीय गायनाचा नजराणा रसिकांना दिला आहे. शिवाय ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा चित्रपटांसाठी त्यांचे पार्श्वगायन लोकप्रिय झाले. तर आगामी ‘अ मंथ अ‍ॅन्ड अ विक’ या चित्रपटासाठीही पार्श्वगायक आणि अभिनेता म्हणूनही राहुल देशपांडे यांनी काम केले आहे.
शास्त्रीय गायनासोबत नाट्यगीत, ख्याल, दादरा, ठुमरी, भजन, गझल आणि भावगीताच्या प्रांतातही राहुल देशपांडे यांनी रसिकांची दाद मिळविली आहे. अशा या बहुआयामी गायकाची मैफल ऐकण्याची संधी यवतमाळकरांना उपलब्ध झाली आहे.

  • २४ नोव्हेंबर, सायंकाळी ६.३० वाजता, प्रेरणास्थळ

राहुल देशपांडे यांचे गायन

  • २५ नोव्हेंबर, सकाळी ९ वाजता, प्रेरणास्थळ

संगीतमय प्रार्थना सभा

  • २५ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता, दर्डा मातोश्री सभागृह

प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांचे व्याख्यान तसेच भारत दौंडकर व अनिल दीक्षित यांच्या कवितांची जुगलबंदी

  • २५ नोव्हेंबर, दुपारी १२ वाजता, हनुमान आखाडा

इनामी काटा कुस्त्यांची दंगल

 

Web Title: Jawaharlal Darda 21st Memorial Festival: Music-Literature Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.