जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे शहिदांच्या कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:41 PM2019-02-18T21:41:29+5:302019-02-18T21:41:43+5:30
येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच तातडीने ही मदत शासकीय वेबसाईटवरून पोहोचविण्यातही आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच तातडीने ही मदत शासकीय वेबसाईटवरून पोहोचविण्यातही आली.
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये (वायपीएस) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ (आशीर्वाद सोहळा) आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसह मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांसह सर्वच मान्यवरांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला.
शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना म्हणाले की, आपण सर्वांनी या कठीण प्रसंगात शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांना शक्य त्या पद्धतीने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुलवामातील घटनेत महाराष्टÑातील दोन जवान शहीद झाले. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर येथील संजय राजपूत या शहीद जवानांच्या परिवारांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा यावेळी किशोर दर्डा यांनी केली. सर्व मान्यवर तसेच शिक्षकांना शहिदांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाईटची माहिती दिली. या लिंकच्या आधारे सर्वांनी शहिदांच्या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.