जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीत आज विदर्भस्तरीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:38 PM2018-01-19T22:38:47+5:302018-01-19T22:51:10+5:30
येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विदर्भातील खासगी व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील अडचणी व समस्या मांडण्यासाठी विदर्भस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विदर्भातील खासगी व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील अडचणी व समस्या मांडण्यासाठी विदर्भस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहे. विदर्भातील ८५ महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडणार आहेत. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया-१८’चे आयोजन २० ते २२ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षणाचा दर्जा वाढविणे, अभ्यासक्रमाचा स्तर उंचाविणे, व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणाली रुजू करणे आणि बेरोजगारीचा निर्देशांक कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विदर्भातील सर्व ८५ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व प्राचार्यांचे चर्चासत्र आयोजित आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर येणाºया अडीअडचणी जाणून घेतील. तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात २० ते २२ जानेवारीपर्यंत ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ.डी.व्ही. जाधव उपस्थित राहणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अभियांत्रिकी स्नातक असून त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत आत्मविश्वास उंचावणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा, ‘जेडीआयईटी’चे प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, चर्चासत्र समन्वयक राजेश संभे, स्रेहसंमेलन आयोजन समितीचे समन्वयक डॉ.पंकज पंडित, डॉ.अतुल राऊत यांनी केले आहे.