जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

By Admin | Published: November 23, 2015 02:07 AM2015-11-23T02:07:14+5:302015-11-23T02:07:14+5:30

दिवाळी नुकतीच झाली. प्रत्येकाने काही तरी नवीन घेतले. भाऊबीजेला भावा-बहिणींनी एकमेकांना भेटी दिल्या. कपडे, शूज, फ्रीज, टीव्ही अशा भेटी दिल्या-घेतल्या गेल्या.

Jawaharlal Darda Foundation and Sadhu Vaswani Mission initiative | जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

googlenewsNext

२०० वर अपंगांना मिळाले हात-पाय :
येथे ‘कर’ सारे जुळती..!

यवतमाळ : दिवाळी नुकतीच झाली. प्रत्येकाने काही तरी नवीन घेतले. भाऊबीजेला भावा-बहिणींनी एकमेकांना भेटी दिल्या. कपडे, शूज, फ्रीज, टीव्ही अशा भेटी दिल्या-घेतल्या गेल्या. पण ज्यांना पायच नव्हते, हातच नव्हते, त्यांना रविवारी बहुमोल सप्रेम भेट मिळाली. तब्बल २०२ अपंगांना मोफत कृत्रिम अवयवांचे गिफ्ट मिळाले. तेही ‘मातोश्री’च्या सावलीत!
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवानी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम २२ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर इन चिफ तथा राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते कृत्रिम हातपायांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमत समाचार औरंगाबादचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
देवापुढे प्रार्थनेसाठी जुळणाऱ्या हातांपेक्षा वंचितांच्या मदतीसाठी सरसावणारे हात अधिक महत्त्वाचे असतात. अशाच मदतगार हातांनी रविवारी हातच नसलेल्या अपंगांना कृत्रिम हात दिले. हे हात कृत्रिम असले तरी त्यातून मिळालेला आनंद अस्सल होता. हात नसलेल्यांना ‘हात’ बसविण्यासाठी तज्ज्ञांचे हात झटत होते. अन् हातोहात मिळालेला हा आनंदाचा क्षण पाहणाऱ्यांचे हात कृतज्ञतेने जुळत होते.
१८ आॅक्टोबर रोजीच जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेऊन अपंग बांधवांची तपासणी करण्यात आली होती. त्यात २२८ पैकी २०२ जणांची मोफत कृत्रिम अवयव बसविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी निवड केली होती. साधू वासवाणी मिशनचे कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉ. सलील जैन आणि त्यांच्या चमूतील तज्ज्ञांनी पुणे येथून हे अवयव तयार करून यवतमाळात आणले. रविवारी २२ नोव्हेंबर रोजी दर्डा मातोश्री सभागृहात पुन्हा शिबिर घेऊन या अपंगांना कृत्रिम अवयव बसवून देण्यात आले. यावेळी डॉ. सलील जैन यांच्यासह त्यांच्या चमूतील मिलिंद जाधव, सुशील ढगे, राहुल सरोज, सुशांत राऊत, जितेंद्र राठोड, संजय शर्मा, संजय जाधव, ज्ञानेश्वर पाटील, अनुराग सिगामनी, विक्की बोर्डे आदींनी प्रत्येक अपंगांची आस्थेने
सेवा केली.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी विलास देशपांडे, सुभाष यादव, प्रा.अभय भीष्म, प्रेमेंद्र रामपूरकर, प्रा. वीरेंद्र तलरेजा, प्रा. असजय कोलाकर, हिरा मिश्रा यांनी परिश्रम घेतले. नगरसेवक अमोल देशमुख, वडगावचे माजी उपसरपंच बाळू काळे, संजय शिंदे पाटील, माणिकराव भोयर, प्राचार्य शंकरराव सांगळे, आनंद गावंडे, राजेश ठाकरे, अतुल भुराणे, मनोज देशपांडे, चंदू अमृतकर, प्रा. अजय चिंचोळकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

कण्हत आले; हसत गेले
कृत्रिम अवयव वितरणाच्या या शिबिरात अनेक अपंग कण्हत कुढत आले. पायच नसल्याने त्यांना रांगत, लंगडत, घुसत, सरपटत यावे लागले. काही जणांना त्यांच्या नातेवाईकांनी अक्षरश: उचलून आणले. अशा शारीरिक इजा त्यांना रोजच सोसाव्या लागत होत्या. पण रविवारी शिबिरात येताना कळा सोसण्याची अपंगांनी मनोमन तयारी केली होती. डॉ. सलील जैन व त्यांच्या टीमने तयार करून आणलेला ‘आपला’ हात किंवा पाय कसा असेल, याचीच त्यांना प्रचंड उत्सुकता होती. वर्षानुवर्षांपासून शारीरिक ‘अपूर्णत्व’ आज संपणार होते. एखादा पाय किंवा हात नसल्यामुळे शरीराचे संतुलन सांभाळण्यात येणाऱ्या अडचणी आज संपणार होत्या. प्रत्येक अपंग याच उत्सुकतेने डॉक्टरांच्या पुढे येत होता. साधू वासवाणी मिशनची टीमही सहृदयतेने प्रत्येक अपंगांला कृत्रिम अवयव बसवून देण्यात व्यग्र झाली होती. कृत्रिम अवयवांच्या वापराबाबत रुग्णांच्या मनात शंका आली की, त्याचेही प्रेमळ भाषेत निरसण केले जात होते. जे अपंग कुणाच्या तरी खांद्याचा आधार घेत आले, कुबड्या घेऊन आले, त्यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला. अन् आत्मविश्वासाने ते उभेही झाले. नुसते उभेच झाले नाही, तर चालूही लागले. पाय-हात हालचाल करीत होते अन् चेहरा आनंदाने ओसंडून गेला होता.

Web Title: Jawaharlal Darda Foundation and Sadhu Vaswani Mission initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.