जवखेड दलित हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या
By admin | Published: November 6, 2014 02:19 AM2014-11-06T02:19:55+5:302014-11-06T02:19:55+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खालसा जवखेड या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मोकाट आरोपींचा तत्काळ शोध घेवून ...
पुसद : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खालसा जवखेड या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मोकाट आरोपींचा तत्काळ शोध घेवून त्यांना बेड्या ठोकाव्या तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून क्रूरकर्मा मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघासह विविध संघटनांनी बुधवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विविध संघटनांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अब्दुल रऊफ शेख यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. दलित समाजाच्या जाधव कुटुंबातील तिघांची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली. ही घटना लोकशाहीला मारक अशी आहे. घटनेला मोठा कालावधी उलटला असताना पोलीस मारेकऱ्यांचा शोध लावू शकले नाही, मग अटक तर दूरचीच बाब. पोलिसांचा नाकर्तेपणा आणि घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शासनाबद्दल प्रचंड रोष आणि नारेबाजी व्यक्त करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसील प्रशासनाला मोर्चातील शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. मोर्चात रिपब्लिकन सेनेचे तालुका प्रमुख संजय इंगोले, परिवर्तन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बळवंत मनवर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष इंदल राठोड, समीर कदम, गणपत गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सवंगडे, प्रेम ढोके, बाबूराव वाघमारे, राजू वाढे, किशोर भगत, अशोक बलखंडे, मुकुंद थोरात, किसन पतंगे, गजेंद्र मुळावकर, शांताबाई धुतडे, सूमन जमदाडे, संतोषी भगत, देवराव हरणे, विजयकुमार कांबळे, पंजाबराव सरदार, तातेराव मानकर, बाबूराव नवसागरे, बाबा खान, शेख जमीर आदींसह शेकडो नागरिकांनी व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)