‘जेडीआयईटी’ची पूनम आंतरराष्ट्रीय परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:21 PM2018-06-28T22:21:09+5:302018-06-28T22:21:50+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थिनी पूनम ओमप्रकाश लढ्ढा हिने थायलंडमधील बँकॉक येथील आरएमयूटीपी आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत सहभाग घेतला.
या परिषदेत पूनम लढ्ढा हिने ‘जेडीआयईटी’च्यावतीने ‘आॅब्जेक्टिव्ह अँड इव्हॉल्यूशन आॅफ डेनिम फॅब्रिक’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या परिषदेत जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध संशोधकांनी शोधनिबंध पाठविले होते. संस्थेद्वारे तज्ज्ञांची समिती शोधनिबंधाची तपासणी व पडताळणी करून परिषदेसाठी शोधनिबंधाची निवड केली जाते. या परिषदेतून नवीन संशोधनाची दिशा व त्यातील तंत्रज्ञानाची जागतिक देवाणघेवाण होते.
पूनम लढ्ढा हिने या परिषदेत जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. तिला परिषदेला उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयातर्फे ४० हजार रुपयांची विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. या दोन दिवसीय परिषदेत जगातील नामांकित टेक्सटाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. पूनम लढ्ढा हिने डेनिमपासून विविध प्रकारचे कापड तयार केले जात असून त्याचे मानवी बहुउपयोगासाठी परिक्षण केले. तिच्यासोबतच प्रोजेक्ट मार्गदर्शक प्रा. संदीप सोनी, प्राचार्य अविनाश कोल्हटकर, प्रा. राम सावंत यांनीही परिश्रम घेतले. तिला योग्य तेथे मोलाचा सल्ला दिला. त्यामुळे पूनम या परिषदेत सहभागी होऊन जागतिकस्तरावर तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.