‘जेडीआयईटी’च्या दोन विद्यार्थ्यांची युरोपमध्ये संशोधन कार्यासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:26 PM2018-06-13T22:26:18+5:302018-06-13T22:26:18+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची युरोपच्या नामांकित टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक, झेक रिपब्लिक या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन कार्यासाठी निवड झाली आहे. यात टेक्सटाईल विभागातील अंतिम वर्षाची अॅना सिरम व तृतीय वर्षाचा विद्यार्थी कुणाल जोतवाणी यांचा समावेश आहे.
टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेकची स्थापना १९५३ मध्ये झाली. या युनिव्हर्सिटीमध्ये पदवी, पदव्युतर आणि पीएच.डी. असे २३ विविध अभ्यासक्रम चालविले जातात. झेक रिपब्लिक ही युरोपच्या मध्यावर असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यास उत्सुक असतात. निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेक आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात समन्वय कराराची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने करारामध्ये विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी नि:शुल्क शैक्षणिक संधी दिली जात आहे. या करार प्रक्रियेतूनच टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्नीकल युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ. विजय बाहेती यांनी डिसेंबरमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान केले होते. टेक्सटाईल विभागात विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उत्साह पाहता त्यांना आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करण्याच्या प्रस्तावाला टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ लिबरेकच्या डीन प्रा.डॉ. हॅना यांच्याकडून मान्यता मिळवून दिली. या प्रस्तावानुरूप अॅना सिरम व कुणाल जोतवाणी यांना ‘प्रिपरेशन आॅफ अॅक्टीवेटेड कार्बन बाय कन्वेन्सनल मायक्रोव्हेव हिटिंग’ या प्रोजेक्टवर कामाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे.