‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:19 PM2019-04-01T21:19:24+5:302019-04-01T21:19:50+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले. या परिषदेत सुमारे ४५ राष्ट्रांमधून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले शोधनिबंध सादर केले. या परिषदेत सुमारे ४५ राष्ट्रांमधून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
इंस्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्थेतर्फे इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅन कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन सिस्टीम ही चौथी आंतरराष्ट्रीय परिषद नाण्यांग विद्यापीठ सिंगापूर येथे घेण्यात आली. यामध्ये जेडीआयइटीतर्फे विद्युत अभियांत्रिकी शाखेतील चौथ्या वर्षाचे विद्यार्थी प्रथमेश ज्ञानेश्वर उपाध्ये, श्रद्धा राजेंद्र तंबाखे, पल्लवी राम उमरे, माहिती तंत्रज्ञान शाखेचे नीलेश ज्ञानेश्वर गुल्हाने, श्रद्धा गणेशलाल जयस्वाल हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी ‘स्मार्ट सोल्यूशन फॉर ट्राफिक कंट्रोल’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.
परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून नाण्यांग विद्यापीठाचे प्रा. पेरी शुम, राष्ट्रीय चुंग हसिंग विद्यापीठ तैवानचे प्रा. गु. चँग यांग, अल्बामा विद्यापीठ यूएसएचे प्रा. यांग सिओ लाभले होते.
विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाची उत्कृष्ट अभियंता आणि संशोधक घडविणारे महाविद्यालय अशी ओळख आहे. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. विदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. शिवाय आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते.