बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 03:06 PM2021-12-13T15:06:08+5:302021-12-13T15:11:48+5:30
रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
यवतमाळ : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, शुक्रवारी रात्री लोहारा, वाघापूर परिसरात दोन घरफोड्या झाल्या. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जांब रोडवरील धनलक्ष्मीनगरमध्ये दोन लाख ६३ हजार रुपयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले असून नागरिक बाहेरगावी जाण्यास घाबरत आहेत.
मारोतराव जगन्नाथ गावंडे यांचा दारव्हा येथे हिऱ्याचा कारखाना आहे. ते दारव्हा येथून अप-डाऊन करतात. १० डिसेंबरला त्यांची पत्नी व मुले बाहेरगावी गेली व गावंडे हेसुद्धा दारव्हा येथे मुक्कामी थांबले. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा दोन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मारोतराव गावंडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
शहरात सातत्याने घरफोड्या होत असून, पोलीस केवळ गुन्हा दाखल होण्यापुरतेच उरले आहेत. आतापर्यंत एकही गुन्हा उघडकीस आणता आलेला नाही. यामुळे घरफोड्यांची दहशत शहरात निर्माण झाली आहे. यावर अंकुश लावण्यात पोलिसांना सपसेल अपयश आले आहे.