पाटणबोरीत शस्त्राच्या धाकावर अडीच लाखांचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2022 12:00 AM2022-10-05T00:00:04+5:302022-10-05T00:01:46+5:30
दाराचा आवाज आल्याने मनोहर खुपाट यांनी उठून बघितले असता, त्यांच्या बेडरूममध्ये दोघेजण उभे होते. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांपैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. मनोहर खुपाट यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने चाकू दाखवून ‘सोना कहा पर है जल्दी बताओ, अगर चिल्लाओगे तो चाकू मार दुंगा’ असे धमकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : मंगळवारी मध्यरात्री येथील सरस्वतीनगरमधील सेवानिवृत्त वनपालाच्या घरात शिरून दोघांनी चाकू व कुऱ्हाडीच्या धाकावर घरातील आलमारीत असलेला दोन लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी शहरात चोरीच्या लागोपाठ घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
पाटणबोरीतील महाकाली मंदिराजवळील सरस्वतीनगरमध्ये सेवानिवृत्त वनपाल मनोहर पैकुजी खुपाट हे वास्तव्याला आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे स्वयंपाक खोलीतून त्यांच्या घरात शिरले. यावेळी मनोहर खुफाट हे बेडरूमध्ये, तर त्यांची पत्नी, मुलगा व सून हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, दाराचा आवाज आल्याने मनोहर खुपाट यांनी उठून बघितले असता, त्यांच्या बेडरूममध्ये दोघेजण उभे होते. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांपैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. मनोहर खुपाट यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने चाकू दाखवून ‘सोना कहा पर है जल्दी बताओ, अगर चिल्लाओगे तो चाकू मार दुंगा’ असे धमकावले. दुसऱ्याने लगेच बेडरूममधील आलमारीची दोन्ही दारे उघडून सोन्याची काळी पोत (२५ ग्रॅम, अंदाजे किंमत एक लाख), सोन्याचा गोफ (चार ग्रॅम १६ हजार रुपये), सोन्याच्या तीन अंगठ्या (१२ ग्रॅम, ४८ हजार रुपये), कर्णफुले (४ ग्रॅम, १६ हजार रुपये), लहान बाळाच्या अंगठ्या (पाच ग्रॅम, वीस हजार रुपये), सोन्याच्या रिंगा (४ ग्रॅम, १६ हजार रुपये), चांदीच्या तोरड्या (३ हजार ६००) व रोख ४० हजार रुपये, असा एकूण दोन लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पिशवीमध्ये भरून बेडरूमच्या मागील दाराने पळून गेले. हे चोरटे महाकाली मंदिराच्या दिशेने पळून गेले.
रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ठाणेदार जगदीश मंडलवार तथा सपोनी हेमराज कोळी यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळावर दाखल झाली. मात्र, पोलिसांच्या हाती सध्या तरी विशेष काही लागलेले नाही. दोन दिवसांतील चोरीची तिसरी घटना असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे पोलिसांनी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सपोनी हेमराज कोळी करीत आहेत.
नागरिकांनी केला चोरट्यांचा पाठलाग
घटनेनंतर हे चोरटे पळून जात असताना पाटणबोरीतील शेख चॉंद पाशा, साहिल बावणे व अनिकेत बावणे यांना दिसले. संशय आल्याने या तिघांनी चोरट्यांवर दगडफेक केली. या धावपळीत चोरट्यांनी चाकू तेथेच टाकला व ते पाटण मार्गाने पळून गेले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते हाती लागले नाही. गेल्या चार दिवसात पाटणबोरीत लागोपाठ चोरीच्या घटना घडत असून अद्याप या चोरट्यांचा शोध घेण्यास पांढरकवडा पोलिसांना यश आले नाही.