जिनिंगच्या जमीन विक्रीत उपनिबंधकांची ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:39 PM2017-10-31T23:39:14+5:302017-10-31T23:39:27+5:30
धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या आठ एकर जागेच्या बेभाव लिलाव प्रकरणात आता जिल्हा उपनिबंधकांची एन्ट्री झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या आठ एकर जागेच्या बेभाव लिलाव प्रकरणात आता जिल्हा उपनिबंधकांची एन्ट्री झाली आहे. उपनिबंधकांनी संबंधित सहकारी संस्थेचे संचालक मंडळ आणि जिल्हा बँकेला पाचारण करून प्रकरणाची प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.
धामणगाव रोडवर यवतमाळ सहकारी जिनिंग आहे. त्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहा कोटी ८४ लाखांचे कर्ज आहे. या कर्जापोटी बँकेने सदर जिनिंगच्या आठ एकर जागेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन रोड व कॉर्नर लाभलेल्या या ंआठ एकर प्रशस्त जागेची बाजारभावानुसार किंमत २४ कोटी रुपये होत असल्याची माहिती रियल इस्टेट व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात. परंतु बँकेच्या मूल्यनिर्धारकाने या जागेची किंमत केवळ दहा कोटी रुपये निश्चित केली आहे. त्यातही लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याचे सांगत विक्री टेंडर काढले गेले. त्यात अधिकाधिक सात कोटींचे टेंडर आले. ते पाहता २४ कोटींची जागा अवघ्या सात कोटीत विकण्याचा घाट जिल्हा बँकेत रचला जात आहे. ‘लोकमत’ने या बेभाव व्यवहाराचा पर्दाफाश केला. मात्र त्यानंतरही सत्ताधीशच आपल्या पाठीशी असल्याने कोण काय बिघडविणार, अशी जिल्हा बँकेची सध्याची राजकीय भूमिका आहे. सहकार प्रशासनालाही बँक जुमानताना दिसत नाही. बँक व सत्ताधीशांची ‘मिलीभगत’ लक्षात आल्याने सहकार प्रशासनही आतापर्यंत या व्यवहाराबाबत अनभिज्ञता दर्शवून दूरुन मजा पाहण्यातच धन्यता मानत होते. परंतु हा व्यवहार अमरावतीच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर आता कुठे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. वास्तविक जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा बँकेचे पदसिद्ध संचालक आहेत. त्यामुळे २४ कोटींची जागा सात कोटीत घेण्याच्या या व्यवहाराबाबत ते अनभिज्ञ असण्याची शक्यता वाटत नाही. तरीही त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यालयाकडेही संशयाने पाहिले जात आहे.
धामणगाव रोडवरील २४ कोटींची जमीन सात कोटीत विकण्याचा प्रयत्न वांद्यात
मंगळवारी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या व्यवहार प्रकरणात आपण आता स्वत: जातीने लक्ष घातले आहे. यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंगचे संचालक तसेच बँकेला पाचारण केले जाणार आहे. नेमका व्यवहार काय व त्याची प्रक्रिया कशी राबविली हे सखोल तपासले जाणार आहे.
यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मर्यादित यवतमाळचे अध्यक्ष ए.पी. हिराणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, थकीत कर्जामुळे २०१५ मध्येच आम्ही बँकेला पत्र दिले. या कर्जातून आम्हाला मुक्त करा व नीलचा दाखला द्या, अशी विनंती केली. त्यामुळे आज जिनिंगच्या या व्यवहाराशी आमचा थेट काहीही संबंध उरलेला नाही. बँकेने ती जागा किती किंमतीत विकायची हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जिनिंगच्या या व्यवहारासंबंधी अधिक माहिती जिनिंगचे व्यवस्थापक राजकुमार जयस्वाल यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल, असे हिराणी यांनी सांगितले.
अमरावतीचे प्रभारी विभागीय सहनिबंधक गौतम वालदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, जागेच्या लिलाव प्रकरणात यवतमाळच्या उपनिबंधकांना तातडीने लक्ष घालण्याच्या व सखोल तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.