मृत्यूच्या तांडवाने हादरला जोडमोहा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:23+5:30
जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गावातीलच महादेव चंदनकर, किसन परसनकर, अंजना वानखडे आणि अमर आत्राम या चौघांचा मृत्यू झाला. शिवाय नातेवाईकांपैकीही आठ जण दगावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : मृत्यूचा चेहरा नेहमीच आक्राळविक्राळच असतो. गावातला एकही जीव दगावला तरी खेड्यांमध्ये दु:खाची तीव्र शोकलहर दीर्घकाळ कायम असते. रविवारी तर जोडमोहाच्या नागरिकांनी तब्बल आठ मृत्यूचे तांडव अनुभवले. एकमेकांचे नातेवाईक असलेले हे आठ मृतदेह पाहताना अक्षरश: अनेकांना घेरी आली. तर गावात रविवारी रात्री कुणाच्याही घरी चूल पेटली नाही.
कळंब-जोडमोहा मार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास वाहन दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. आपल्या दिवंगत आप्ताचा मृत्यू पश्चातचा संस्कार पूर्ण करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच काळाने घाला घातला.
जोडमोहा येथील वेल्डींग व्यावसायिक बाबाराव वानखडे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी कुटुंबातील सदस्य तसेच मुली, जावई कोटेश्वर येथे गेले होते. मात्र तेथून गावाकडे परत येताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. यात एकट्या जोडमोहा गावातीलच महादेव चंदनकर, किसन परसनकर, अंजना वानखडे आणि अमर आत्राम या चौघांचा मृत्यू झाला. शिवाय नातेवाईकांपैकीही आठ जण दगावले. या घटनेने जोडमोहाची पंचक्रोशी शोकसागरात बुडाली.
मदतीसाठी धावले स्वयंसेवक, डॉक्टर
अपघातग्रस्तांना यवतमाळच्या मेडिकलमध्ये आणताच रविवार असूनही डॉक्टरांनी प्रचंड धावपळ केली. तर प्रतिसाद फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनीही मदत केली. प्रतिसादचे राजू मदनकर, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी अमोल जाधव, विश्वकांत गावंडे, जितेंद्र गोडबोले, करण स्वर्गे, आशा मेश्राम, रेश्मा ब्राम्हणकर, प्रशांत वरके, राजेंद्र सदावर्ते यांनी तत्काळ उपचारासाठी मदत केली.