भाविकांचे श्रद्धास्थान जांभोराचे दत्त मंदिर

By Admin | Published: December 24, 2015 03:10 AM2015-12-24T03:10:47+5:302015-12-24T03:10:47+5:30

महानुभाव पंथीयांच्या धार्मिकस्थळांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेले जांभोरा (दत्त) हे एक तीर्थक्षेत्र आहे.

Jubhora Dutt Temple of devotees | भाविकांचे श्रद्धास्थान जांभोराचे दत्त मंदिर

भाविकांचे श्रद्धास्थान जांभोराचे दत्त मंदिर

googlenewsNext

यात्रा महोत्सव : महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र
पांडुरंग भोयर सोनखास
महानुभाव पंथीयांच्या धार्मिकस्थळांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेले जांभोरा (दत्त) हे एक तीर्थक्षेत्र आहे. गावाच्या दक्षिणेला उंच टेकडीवर दत्त प्रभूंचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी दत्त जयंतीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी दर्शनासाठी राज्यातीलच नव्हेतर राज्याबाहेरील मंडळी उपस्थित असतात.
दारव्हा तालुक्यातील लाडखेड गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जांभोरा गाव आहे. महानुभाव पंथीयांच्या उपखांडीपैकी एक होय. डोंगर पर्वत, घनदाट झाडीत पूर्वी हे मंदिर होते. ४०० वर्षे जुने मंदिर असून या मंदिरात दत्तप्रभूंची लोभस मूर्ती दृष्टीस पडते. या स्थळाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. चार शतकापूर्वी येथील पुजारी दरदिवशी माहूरगडावर देवदर्शनासाठी जात असते. काही काळानंतर वृद्धावस्थेमुळे त्याचे जाणे बंद होण्याच्या मार्गावर आले. त्यावेळी दत्तप्रभूने स्वप्नात येऊन येथेच तू रोज पूजा करीत जा, असे सांगितले. त्यामुळे येथे दत्तप्रभूंची मूर्ती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही आख्यायिका मंदिराच्या भिंतीवरील संगमवरी शिलेवर आजही पहावयास मिळते.
या ठिकाणी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी भागातून भाविक सातत्याने दर्शनासाठी येतात. मंदिर जमिनीपासून ६० फूट उंच टेकडीवर आहे. श्रावण महिन्यात सहा बुधवार येथे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सहावा छबीना म्हणून सर्व भाविक तेथे दर्शनासाठी असतात. दररोज नित्यनेमाने पहाटे ५ वाजता, दुपारी १२ वाजता, सायंकाळी ७ वाजता, रात्री १० वाजता वाद्यांच्या गजरात येथे आरती केली जाते. येथे महानुभाव पंथीयांचे महंत, शिष्यगण यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी दत्त जयंतीनिमित्त २४ ते २७ डिसेंबरपर्यंत यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जन्मोत्सव, पालखी सोहळा, संतांचे विचार आणि दहीहांडीचे आयोजन करण्यात आले आहे. महानुभाव पंथीयांच्या या श्रद्धास्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देवून विकास करावा, अशी अपेक्षा भाविक करीत आहे.

Web Title: Jubhora Dutt Temple of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.