जंगल, वन्यजीव, अनुसूचित जमाती परस्पर पूरक घटक
By admin | Published: August 25, 2016 01:45 AM2016-08-25T01:45:48+5:302016-08-25T01:45:48+5:30
जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तीन घटक मिळून संपूर्ण जंगल निर्माण होते.
अनिल दवे : जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा, वनांच्या संरक्षणासाठी प्रयत्न
यवतमाळ : जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तीन घटक मिळून संपूर्ण जंगल निर्माण होते. हे तिनही घटक परस्पर पूरक असून वनांच्या जतनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे स्वतंत्र राज्यमंत्री अनिल दवे यांनी केले.
येथील विश्रामगृहात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना अनिल दवे पुढे म्हणाले, पूर्वीपासून वनउपजावर वनवासींचा अधिकार होता. मात्र ब्रिटीशांनी वनवासींचा अधिकार नाकारून जंगले आरक्षित केली. त्यांनी वनवासींचा वनउपजाचा अधिकार नाकारला. या अन्यायाविरूद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडे यांनी जंगल सत्याग्रह पुकारला. सन १९३0 मध्ये ते नागपूर, वर्धामार्गे यवतमाळ जिल्ह्यातील करळगाव जंगलात धडकले. तेथे त्यांनी गवत कापून जंगल सत्याग्रह केला.
या घटनेला आता ९६ वर्षे लोटली. अशा विविध स्मृतींना उजाळा देण्यासाठी भाजपाने तिरंगा सन्मान रॅली अंतर्गत विविध उपक्रम सुरू केले. त्यानुसार जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणी जुन्या स्मृती जागविण्यासाठी आपण यवतमाळात आल्याचे दवे यांनी सांगितले. जंगल सत्याग्रह केल्यामुळे हडगेवार यांना ब्रिटीशांनी कारावास ठोठावला होता, असेही त्यांनी नमूद केले. जंगल, वन्यजीव आणि अनुसूचित जमाती, हे तिनही घटक परस्पर पूरक असून त्याच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे, भाजयुमोेचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
केवळ स्मारक नको, जनजागृती व्हावी
यवतमाळ जिल्ह्यात करळगाव आणि पुसद तालुक्यातील धुंदी येथे जंगल सत्याग्रह झाला होता. या दोन्ही ठिकाणी स्मारके आहेत. मात्र ती दुर्लक्षित आहे. या दोन्ही ठिकाणची स्मारके जनजागृती केंद्रे व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज अनिल दवे यांनी प्रतिपादीत केली. जमीन हा राज्य शासनाचा विषय असून राज्य शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. या ठिकाणी मुलांना बागडण्यासाठी बगिचा, त्यांना जंगलाबद्दल माहिती देण्याची सुविधा असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.