कैद्यांच्या तुरुंग कहाण्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:38 PM2018-01-05T21:38:36+5:302018-01-05T21:39:01+5:30

शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो.

Junk Threats Prisons Quotes | कैद्यांच्या तुरुंग कहाण्यांचा थरार

कैद्यांच्या तुरुंग कहाण्यांचा थरार

Next
ठळक मुद्देकुटुंब उद्ध्वस्त : समाज-नातेवाईकांचा दुरावा, लग्न-समारंभ, कामालाही बोलवेना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो. लग्न समारंभात टाळले जाते, एवढेच काय गावात कुणी कामालाही बोलावत नाही, अशी व्यथा कैद्यांनी बोलून दाखविली.
कैदी व न्यायाधीन बंद्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘वऱ्हाड’ या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज-मोझरी (जि. अमरावती) येथे किलबिल सेंटरमध्ये ‘तुरुंग कहाण्या : बंदीवास ते पुनर्वसन’ हा कार्यक्रम घेतला. २९, ३० व ३१ डिसेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम झाला. विदर्भाच्या यवतमाळसह ११ जिल्ह्यातील सुमारे १०० कैदी-न्यायाधीन बंद्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यात तब्बल ४० महिलांचा समावेश होता. उपस्थितांपैकी बहुतांश खुनाच्या गुन्ह्यातील होते.
कुणी २० वर्षे तर कुणी १० वर्षे शिक्षा भोगलेले, सत्र न्यायालयाने शिक्षा दिली, परंतु उच्च न्यायालयात निर्दोष सुटलेल्यांचा त्यात समावेश होता. या निवासी कार्यक्रमाला बाहेरुन कोणत्याही वक्त्याला बोलाविण्यात आले नव्हते. तर उपस्थित कैदीच एकमेकांचे नातेवाईक, मित्र व वक्ते झाले होते. त्यांनी आपले थरारक अनुभव या कार्यक्रमात कथन केले. यावेळी त्यांनी कारागृहात चालणारे धक्कादायक प्रकारही उघड केले.
पॅरोल-फर्लो रजा महागली
पॅरोल-फर्लो रजा पूर्वी १०० रुपयांच्या बाँडवर जामीन देऊन मिळत होती. मात्र शासनाने आता हे नियम कडक केले असून २० ते २५ हजार रुपयांचा जामीन मागितला जातोय. आधीच सर्व उद्ध्वस्त झालेल्यांनी २५ हजार आणायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
जिवंतपणीच मृत्यूच्या यातना
कारागृहातली शिक्षा तुलनेने सुसह्य असते. पण कारागृहातून बाहेर आल्यावर भोगावा लागणारा सामाजिक बहिष्कार जिवंतपणीच मृत्यूच्या यातना देत असतो. हाच थरारक, विदारक अनुभव कैद्यांनी बोलून दाखविला. यावेळी बहुतेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या कैद्यांच्या सुटकेसाठी ‘वऱ्हाड’ने प्रयत्न केले, हे विशेष!
यवतमाळच्या कैद्याने गमावले वर्षभरात कुटुंबातील दोन जीव, धक्क्याने झाले मृत्यू
यवतमाळच्या एका कैद्याने सांगितले की, मी कारागृहात गेलो याचा धक्का कुटुंबाला सहन करता आला नाही. त्यामुळे दीड वर्षातच कोणताही आजार नसलेल्या पत्नी व पाठोपाठ मुलाचे निधन झाले.
अकोल्यातील महिलेने सांगितले की, तिचा पती कारागृहात आहे. तो सुटावा म्हणून घरदार विकून फी दिली. मात्र सुटका झाली नाही. आता उच्च न्यायालयात जाण्याची आर्थिक कुवत नाही. लहान मुलगा आहे, त्यामुळे रहावे कुठे, जगावे कसे, हा प्रश्न आहे. जागा नसल्याने घरकूलही मिळू शकत नाही.
बुलडाण्यातील महिलेने सांगितले की, कौटुंबिक प्रकरणात आम्ही दोघी कारागृहात होतो. आम्ही जामिनावर आलो, परंतु आमच्या कुटुंबातील चौघेही पुरुष कारागृहात आहेत. सासू व दोन जाऊ एवढ्या तीन महिलाच बाहेर आहेत. पुरुषांना सोडवावे कसे, याचा प्रश्न उभा आहे.
एका कैद्याने सांगितले की, मी १९ वर्षे जन्मठेप भोगली. परंतु मी निर्दोष आहे, पाहिजे तर गावकऱ्यांना विचारा. एका मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे मला शिक्षा झाली आणि माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.
एक कैदी म्हणाला, कारागृहातून बाहेर पडल्यावर खुनाचा अनुभव आहे म्हणून थेट खूनाच्याच सुपाऱ्यांची आॅफर येऊ लागली. एकवेळ हातून खून करण्याची चूक झाली. म्हणून पुन्हा-पुन्हा खून करणार काय? असे ठणकावत ही आॅफर धुडकावली.
एका कैद्याने सांगितले की, गुन्हा घडला, शिक्षा झाली, प्रायश्चित्त घेतले. पण आता पुन्हा कधीही त्या वाटेने जाणे नाही.

Web Title: Junk Threats Prisons Quotes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.