जनदु:ख निवारणार्थ भर उन्हात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:59 PM2019-04-27T20:59:44+5:302019-04-27T21:00:07+5:30
समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत.
जयकुमार पोकळे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. समाजातील लोकांचे प्रश्न घेऊन त्यांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलने केली आहेत. प्रत्येकवेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आश्वासने दिली जाते. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्नही मार्गी लावण्यात येत नाही. आता त्यांनी उपोषणाचा सहावा टप्पा सुरू केला आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना अधिकाऱ्यांकडून त्यात हस्तक्षेप केला जातो. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव, पोट हिस्सा तेथे विहीर, स्वस्त दरात वीज, बी-बियाणे व कीटकनाशकांचा पुरवठा, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण, पीककर्ज हेक्टरी ६० हजार रुपये, शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सीसी लिमीट, कापूस व सोयाबीनला चांगला भाव आदी मागण्या आहेत.
पेन्शनरांना सण अग्रीम मिळावे, लोनसाठी वयाची अट काढून टाकावी, २००४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ५० टक्के वेतनाचा भेद दूर करावा, कर्जाची परतफेड होईल, अशी खात्री असताना कर्ज मंजुरीस विलंब या व इतर पेन्शनरांच्या प्रश्नांना घेऊन पोकळे व शिरसाट यांनी उपोषण सुरू केले.