जुनोनी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार उघड
By admin | Published: January 23, 2016 02:41 AM2016-01-23T02:41:44+5:302016-01-23T02:41:44+5:30
येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील जुनोनी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भोंगळ कारभार सुरू आहे. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
घोन्सा : येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील जुनोनी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भोंगळ कारभार सुरू आहे. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाअंतर्गत जुनोनी येथे शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. या शाळेत विद्यार्थ्यांना शासनातर्फे अनेक सुविधा देण्यात येतात. मात्र सोयीसुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र येथील विद्यार्थ्यांना थंड्या पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणीसुद्धा मिळत नाही. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून सौर ऊर्जेवरील पाणी गरम करण्याचे यंत्र या आश्रमशाळेत बसविण्यात आले आहे. मात्र तेथील पाण्याची टाकीच गायब झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने भर थंडीत थंड्या पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आश्रमशाळेत लाखो रूपये खर्च करून जनरेटर घेण्यात आले. मात्र हे जनरेटर धुळखात पडले आहे. त्याच्या देखभालीकडे कुणाचेही लक्ष जात नाही. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सोबतच एखादा विद्यार्थी आजारी पडला, तर त्याच्यावर प्राथमिक उपचारसुद्धा तेथे होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट झरी येथील शासकीय दवाखान्यात न्यावे लागते. झरी येथे जाण्यासाठी वेळ लागतो. तसेच ऐनवेळी कोणतेही वाहन मिळत नाही. त्यामुळे एखादवेळी अघटित घडण्याची शक्यता बळावली आहे.
त्याचबरोबर या आश्रमाशाळेकडे कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने मुख्याध्यापक व शिक्षक वेळेवर तासिकासुद्धा घेत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आश्रमशाळेचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)