जरा हटके; ७५ अनाथ मुलींसाठी उभारला कन्यादान निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:14 PM2019-01-15T12:14:26+5:302019-01-15T12:17:27+5:30
नेरच्या एका शिक्षकाने असाच समाजशिक्षकाचा वास्तूपाठ घालून दिला आहे. ७५ अनाथ मुलींसाठी त्यांनी स्वत:च्या कष्टातून कन्यादान निधी उभा केला.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सातवा वेतन आयोग लागला का हो गुरुजी? आपल्याला किती अरिअर्स मिळेल? केंद्राप्रमाणे मिळेल की नाही?... हेच प्रश्न सध्या शिक्षकांच्या चर्चांमध्ये सुपरहिट आहेत. पण शिक्षक केवळ पैसा कमावण्यासाठी नसतो. विद्यार्थ्यांना अन् अवघ्या समाजालाच ज्ञानश्रीमंत बनविणे हे त्यांचे कर्तव्य असते. नेरच्या एका शिक्षकाने असाच समाजशिक्षकाचा वास्तूपाठ घालून दिला आहे. ७५ अनाथ मुलींसाठी त्यांनी स्वत:च्या कष्टातून कन्यादान निधी उभा केला. याची कुणाला कुणकुणही लागू दिली नाही. परवा ते जग सोडून गेले, तेव्हा त्यांच्या या मोठेपणाची नेरवासीयांना माहिती मिळाली अन् सारेच त्यांच्या दातृत्वापुढे नतमस्तक झाले.
या शिक्षकाचे नाव आहे नारायणराव बोरकर. नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे मेंदूच्या आजाराने निधन झाले. माणसाच्या मृत्यूनंतर मोठी चर्चा होते. तशीच बोरकर गुरुजींचीही झाली. या चर्चेतूनच त्यांच्या मोठेपणाची ओळख सर्वांनी पटली.
नारायण बोरकर हे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. काही वर्षांपूर्वी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. पण सेवानिवृत्तीचा काळ स्वत:पुरता विचार करत सुखाने घालविण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा त्यांचा निर्धार होता. बोरकर यांनी नेर अर्बन पतसंस्थेत डेली कमिशन एजंट म्हणून काम सुरू केले. पण हे काम स्वत:साठी नव्हते. त्यामागे वेगळाच उद्देश होता. या कामातून त्यांना जे कमिशन मिळायचे, त्यातून त्यांनी समाजातील अनाथ, गरीब मुलींसाठी पैसा जमा केला. साडेसहा वर्षांच्या दामदुप्पट योजनेत त्यांनी ७५ मुलींच्या नावाने ५००, १००० रुपयांचे बाँड घेतले. याची इतर कुणाला माहिती दिली नाही. केवळ ज्या मुलींच्या नावे हे बाँड काढले, त्यांच्यापर्यंत बाँड पोहोचवून दिले. या माध्यमातून त्यांनी ‘कन्यादान निधी’ची तरतूद केली होती. इतर कुणालाही माहिती नसली तरी पतसंस्थेला याची माहिती होती. त्यामुळेच या कामाची दखल घेऊन पतसंस्थेने त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारही बहाल केला होता.
निवृत्तीनंतरही समाजातील निराधार मुलींसाठी झटणारे नारायणराव बोरकर हे आपल्या नोकरीच्या कालावधीतही उत्तम शिक्षक होते. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी संत गाडगेबाबा यांची प्रेरणा घेऊन शिवाजी नगर परिसरात खराटा घेऊन स्वच्छता केली. शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शासनाची शिष्यवृत्ती मिळवून शिकू शकले. या संवेदनशील निवृत्त मुख्याध्यापकाच्या निधनाने नेर शहर हळहळले. त्यांच्या मागे देवीदास बोरकर, नंदकिशोर बोरकर यांच्यासह पाच मुले आहेत.
नारायणराव बोरकर यांनी निवृत्तीनंतर डेली कलेक्शनची एजन्सी घेतली. मिळणाऱ्या कमिशनमधून त्यांनी गरीब मुलींसाठी दामदुप्पट अंतर्गत किमान ७५ मुलींच्या नावाने डिपॉझिट टाकले. १०१ मुलींच्या नावे ते कन्यादान योजनेत रक्कम गुंतविणार होते. पण मृत्यूने त्यांचा संकल्प थांबला.
- प्रदीप झाडे, महाव्यवस्थापक,
नेर अर्बन पतसंस्था