एक दिवस पुरेल इतकाच बारदाना
By admin | Published: April 26, 2017 12:11 AM2017-04-26T00:11:02+5:302017-04-26T00:11:02+5:30
नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे
३१ कोटींचे चुकारे रखडले : ३५ हजार क्विंटल तुरीचे ट्रान्सपोर्ट थांबले
यवतमाळ : नव्याने तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्याजवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना शिल्लक आहे. यामुुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तत्काळ बारदाना न पोहोचल्यास स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १३ केंद्रावर ६३ हजार ५०० क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्यासाठी एक लाख २७ हजार पोती लागणार आहे. प्रत्यक्षात या केंद्राजवळ २४ हजार पोतेच शिल्लक आहे. यामध्ये १२ हजार क्विंटल तूर मोजता येणार आहे. एका दिवसातच हा बारदाना संपणार आहे. यामुळे इतर तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्राजवळ पोतेच नाही.
२२ एप्रिलनंतर एक दानाही तूर खरेदी करायची नाही. असाच केंद्र शासनाचा प्रयत्न होता. यामुुळे अनेक अडचणी निर्माण करून बारदाना रोखण्यात आला. अजूनही या केंद्रावर बारदाना नाही.
६३ हजार ५०० क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी १३ केंद्रांना एक लाख २७ हजार पोते बारदाना लागणार आहे. हा बारदाना मिळविण्याच्या प्रतीक्षेत पुन्हा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात तूर खरेदी झाली. यामुळे १५ केंद्रांतील तूर खरेदीचा शासकीय आकडा एक लाख ९५ हजार क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. या तुरीचे किंमत ९५ कोटी ७८ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी ६४ कोटींच्या तुरीचे चुकारे झाले आहे. ३१ कोटी ५३ लाख रूपयांचे चुकारे महिन्यापासून बाकी आहेत.
शेवटच्या चार दिवसात खरेदी झालेली ३५ हजार ३०२ क्विंटल तूर केंद्रावर पडून आहे. २२ एप्रिलला तूर खरेदी केंद्र बंदची घोषणा झाली. यामुळे खरेदी झालेली तूर केंद्रावरच पडून आहे. या तुरीचे ट्रान्सपोर्ट बाकी आहे. सीडब्ल्यूसी आणि वखार महामंडळात तूर ठेवण्यासाठी जागा नाही. जोपर्यंत ही तूर गोदामात पोहोचणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणारे चुकारे थांबणार आहे. (शहर वार्ताहर)
नऊ हजार शेतकऱ्यांचा मुक्काम
मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक शासकीय केंद्रावर जाऊन रजिस्टरच्या नोंदी घेतल्या. हे रजिस्टर अंतिम शेतकऱ्याच्या नावावर स्वाक्षरी करून सिल करण्यात आले.