ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ यवतमाळात ‘स्वरांजली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:06 PM2018-03-20T23:06:02+5:302018-03-20T23:06:02+5:30

लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २२ मार्च रोजी

Jyotsna Darda Smruti Prethy Yavat's 'Swaranjali' | ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ यवतमाळात ‘स्वरांजली’

ज्योत्स्ना दर्डा स्मृतीप्रीत्यर्थ यवतमाळात ‘स्वरांजली’

Next
ठळक मुद्दे२२ मार्चला आयोजन : सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे व शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांची मैफल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘प्रेरणास्थळ’ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका, विदर्भ कन्या, सारेगामापा फेम वैशाली माडे-भैसने आणि प्रतिथयश भारतीय शास्त्रीय संगीत गायक रमाकांत गायकवाड यांची मैफल रंगणार आहे.
आयुष्यभर संगीताची साधना करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांचा स्मृतिदिन दरवर्षी संगीतप्रेमींना तृप्त करतो. सुरांच्या उपासनेची ही परंपरा जपत यंदाही स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आपल्या जादुई सुरांची बरसात यवतमाळकरांवर करणार आहे. हिंगणघाटच्या असलेल्या वैशालीने सिनेसृष्टीत पार्श्वगायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत उत्तम गायन करणाºया वैशालीचे सूर यवतमाळकरांना ऐकायला मिळणार आहे. यासोबतच शास्त्रीय संगीतप्रेमींना शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा आनंद लुटता येणार आहे. अवघ्या ३० वर्षाचे असलेले रमाकांत गायकवाड यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. शास्त्रीय गायनातील त्यांची परिपक्वता प्रचंड आहे. देश-विदेशात मैफीली गाजविणारा गायकाला ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिथयश पार्श्वगायिका वैशाली माडे
संगीताचा कुठलाही वारसा नसलेली वैशाली माडे यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीच्या गायनात आपला ठसा उमटविला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील अनंत माडे यांच्याशी लग्न झाल्यावर तिच्या गायनाला अधिकच बहर आला. २००९ मध्ये संपूर्ण देशाने तिची दखल घेतली. सारेगामापा हा गायनाचा शो वैशालीने अक्षरश: गाजविला. आज ती दर्जेदार गायिका म्हणून नावारुपास आली आहे. २०११ मध्ये पार्श्वगायिका म्हणून वैशालीची सिनेसृष्टीत एन्ट्री झाली. दमादम या सिनेमातील ‘हम तुम’ हे गीत लोकप्रिय झाले. २०१२ मध्ये तिचा ‘सुकून’ स्वतंत्र अल्बम प्रसिद्ध झाला. वैशालीचे सर्वात हिट झालेले आणि रसिकांच्या मनात कायम स्थान मिळविलेले गाणे म्हणजे ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा गं बाई पिंगा’ होय. सिने जगतात गाजत असलेले वैशाली माडे हे नाव टीव्ही मालिकांच्या दुनियेतही सर्वप्रिय आहे. अत्यंत कमी कालावधीत तिच्या नावावर महत्वाचे पुरस्कार जमा झाले आहेत. त्यात कर्मयोगी अवार्ड, बेस्ट प्लेबॅक फिमेल अवार्डचा समावेश आहे.
शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे गिरविणाºया पुणे येथील रमाकांत गायकवाड या प्रतिथयश शास्त्रीय गायकाने देश-विदेशात अनेक मैफिली आणि गायन स्पर्धा गाजविल्या आहे. वडील पं. सूर्यकांत, आई संगीता यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. डॉ. सतीश कौशिक आणि पद्मश्री पंडित जगदीश प्रसाद यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. किराणा आणि पटियाला घराण्याच्या शैलीत वयाच्या सहाव्या वर्षापासून रमाकांत यांनी गायनाचे जाहीर कार्यक्रम सुरू केले. न्यूयॉर्क येथे झालेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत रमाकांत गायकवाड यांनी पहिले पारितोषिक पटकाविले होते. शास्त्रीय गायनातील त्यांची परिपक्वता इतकी प्रचंड आहे की, कुणीही त्यांचे वय ३० वर्षाचे आहे, यावर विश्वास ठेवणार नाही. रमाकांत गायकवाड यांना २०१७ मध्ये ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांना भारत सरकारतर्फे युवा कलावंत म्हणून शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतरत्न डॉ.एम.एस. सुब्बालक्ष्मी फेलोशिप, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी स्वरभास्कर पुरस्कारासह विविध पुरस्कार पटकाविले आहेत. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरूनही त्यांचे कार्यक्रम झाले आहे.

Web Title: Jyotsna Darda Smruti Prethy Yavat's 'Swaranjali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.