कळंबच्या चिंतामणीचा कारभार विश्वस्तांशिवाय
By admin | Published: May 24, 2016 12:13 AM2016-05-24T00:13:27+5:302016-05-24T00:13:27+5:30
येथील चिंतामणी देवस्थानची अॅडव्हॉक बॉडी एप्रिल २०१५ मध्ये न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाने बरखास्त झाली.
देवस्थानचा विकास खुंटला : भाविकांमध्ये नाराजीचा सूर, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे कामकाज
कळंब : येथील चिंतामणी देवस्थानची अॅडव्हॉक बॉडी एप्रिल २०१५ मध्ये न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाने बरखास्त झाली. नवीन विश्वतांची रितसर निवड करण्याच्या सूचना न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिल्या. यावरून एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधी लोटला. तरीही या देवस्थानचा कारभार विश्वतांविनाच हाकला जात आहे.
चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये १३ वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. फार काळ चाललेल्या विश्वस्तांच्या भांडणामुळे चिंतामणीचा विकास ठप्प पडला होता. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्त, यवतमाळ यांना श्री चिंतामणी देवस्थानच्या घटनेतील कलम ९ प्रमाणे नवीन विश्वस्तांची निवड प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश होते. न्यायालयाच्या आदेशाने तत्काळ नव्याने विश्वस्तांची निवड होईल, असे वाटले होते. परंतु एक वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लोटला असतानाही विश्वस्तांच्या निवडीकडे का दुर्लक्ष केले जात आहे, हा प्रश्न चिंतामणी भक्तांना पडला आहे.
चिंतामणीचा कारभार केवळ कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. दानपेटी उघडणे अथवा इतर कामासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातून एक कर्मचारी पाठविला जातो. अन्यथा याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ठोस निर्णयाअभावी बहुतेकवेळा भाविकांना असुविधेचा सामना करावा लागतो. महिन्याकाठी लाखोंची उलाढाल असलेल्या या मंदिरात अजूनही भाविकांसाठी पर्याप्त सुविधा नाही. त्यामुळे भाविकांच्या जमा पैशातून भाविकांनाच का वाऱ्यावर सोडले गेले, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
निरपेक्ष भावनेतून विकासाची तळमळ आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांची विश्वस्त म्हणून निवड करणे गरजेचे आहे. यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी कळंबवासी आणि भाविकांची अपेक्षा आहे.
(तालुका प्रतिनिधी)
न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करणार
श्री चिंतामणी देवस्थान येथे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नवीन विश्वस्तांची निवड करावी, यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर कळंबवासीयांनी तक्रारी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक धर्मादाय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करून विश्वस्त निवडण्यात येईल, असे उत्तर पाठविले आहे. परंतु कधीपर्यंत निवड करण्यात येईल, प्रक्रियेला कधी सुरुवात केली जातील यासंदर्भात कुठलाही उल्लेख केला नाही. त्यामुळे अजून किती दिवस असाच प्रकार सुरू राहील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता लोकांच्या भावना तीव्र व्हायला लागल्या आहेत. याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.