कळंब कृषी कार्यालयात कपाशीची बोंडे फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:59 PM2017-11-28T21:59:23+5:302017-11-28T21:59:46+5:30
तालुक्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्याच्या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले.
आॅनलाईन लोकमत
कळंब : तालुक्यात कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्याच्या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले. मात्र अद्याप सर्वेक्षण करून अहवाल सादर न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तालुका कृषी कार्यालयाला घेराव घातला. यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आत्तापर्यंत ७०० च्यावर शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे अर्ज करून बोंडअळीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मात्र केवळ ४० शेतकऱ्यांच्या शेताचेच सर्वेक्षण पूर्ण झाले. त्याचाही अहवाल तयार नाही. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी शेकडो शेतकरी येथील कृषी कार्यालयावर धडकले. मात्र तालुका कृषी अधिकारी संजय पाठक व अधिनिस्त कृषी अधिकारी हजर नव्हते.
त्यांच्याशी फोनवर संपर्क करण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी शेतातून जमा करुन आणलेली कपाशीची बोंडे कृषी अधिकाºयांच्या कक्षात भीरकावले. त्यांच्या टेबलवर बोंडे ठेवून निषेध म्हणून खुर्चीला हार घातला.
यावेळी बियाणे कंपनी व कृषी विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर चक्क कृषी विभागाच्या कार्यालयातच शेतकऱ्यांनी सभा घेऊन आपल्या भावना व्यक्त करुन शेतकऱ्यांना कसे नागविले जाते, याचा पाढा वाचला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार केला. बियाणे कंपनीविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला.