करंजखेडचे रेती चोरी सत्र थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:45+5:302021-07-10T04:28:45+5:30
महागाव : तालुक्यातील करंजखेड रेतीघाट तस्करांच्या निशाण्यावर आहे. या घाटातून हजारो ब्रास रेतीची चोरी सुरू आहे. तेथील रेती चोरीचे ...
महागाव : तालुक्यातील करंजखेड रेतीघाट तस्करांच्या निशाण्यावर आहे. या घाटातून हजारो ब्रास रेतीची चोरी सुरू आहे. तेथील रेती चोरीचे सत्र थांबता थांबत नाही.
तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या करंजखेड फाट्यावरून दररोज किमान २५ ट्रॅक्टर रेती वाहतूक केली जाते. काही वाहतूकदार अधिकाऱ्यांसोबत संधान साधून असल्यामुळे वाहनधारकांवर कारवाई होत नाही. जे अधिकाऱ्यांना ‘भेटत’ नाही, अशांची वाहने जाणीवपूर्वक पाठलाग करून पकडली जातात. त्यांच्यावर कारवाई केली जाते, असा अनुभव रेती वाहतूक करणारे सांगतात.
करंजखेड रेती घाटाचा लिलाव झाला असता, तर शासनाला किमान दोन-तीन वर्षांत चार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता. या घाटावरील रेतीची अवैध वाहतूक बंद करावी म्हणून करंजखेडच्या सरपंचांनी अनेकदा तहसील प्रशासनाला पत्र दिले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हा घाट जाणीवपूर्वक लिलाव केला जात नाही, असा परिसरातील गावकऱ्यांचा आरोप आहे.
बॉक्स
शहरातील पूस नदी पात्रातूनही अवैध उपसा
करंजखेड व महागाव शहरातील पूस नदी पात्रातून होत असलेला रेतीचा अवैध उपसा तहसील कार्यालयाच्या चांगलाच फायद्याचा ठरू लागला आहे. रेती तस्कर व अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लाखोंचे पाट वाहत आहेत. त्यामधून एका नायब तहसीलदाराला बराच लाभ झाल्याचे सांगितले जाते. या मिळकतीमधूनच त्यांनी नुकतेच नवीन चारचाकी वाहन खरेदी केल्याची चर्चा रंगत आहे.