यवतमाळातील शिवालयात मिळते केदारनाथ दर्शनाचे सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:19 PM2019-03-03T22:19:55+5:302019-03-03T22:20:42+5:30

भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झाली.

Kedarnath Darshan is available in Shiva at Yavatmal | यवतमाळातील शिवालयात मिळते केदारनाथ दर्शनाचे सुख

यवतमाळातील शिवालयात मिळते केदारनाथ दर्शनाचे सुख

Next
ठळक मुद्देमहाशिवरात्री विशेष : केदारेश्वर व कमलेश्वर मंदिराचा इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झाली. हजारो वर्षापूर्वीचा हा इतिहास आजही मंदिराच्या रूपात उभा आहे. प्राचिन शिल्पकेलचा वारसा सांगणारी अशी दोन मंदिरे यवतमाळ शहरात आहेत. यामध्ये आझाद मैदानालगतचे केदारेश्वर मंदिर आणि लोहारातील कमलेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला यवतमाळच्या भाविकांना केदारनाथ दर्शनाचे सुख आपल्या गावातच मिळणार आहे.
काळ्या दगडांपासून बांधल्या गेलेली ही मंदिरे आजही दिमाखदारपणे उभी आहे. याला एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मंदिराची उभारणी करताना खास तंत्राचा वापर करण्यात आला. आतील भागात खांबांवर चिरेदार नक्षीकाम आहे. परिसरात विस्तीर्ण जलकुंड आहे. त्यामध्ये भुयारही आहे. या जलकुुंडाला मुबलक पाणी आहे. मंदिराच्या परिसरात शितला माता, नाग मंदिर, काल भैरव, मारूती, शनिमंदिर, अंबिका माता आणि काशिनाथ महाराजाचे मंदिर आहे.
दोन घास भुकेल्यांना
डोंगरे महाराजांनी यवतमाळात कथा प्रवचन केले. यावेळी त्यांना मिळालेली देणगी बँक खात्यात जमा केली. त्याच्या व्याजावर धान्य घेऊन दररोज भिक्षेकऱ्यांना या ठिकाणी भोजन दिले जाते. अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष भोजनदान करण्यात येते. दररोज १५० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. श्रावण, शिवरात्री, काशिकर महाराज पुण्यतिथी, गरुपौर्णिमा, हरिहर भेट, संक्रांत दीपमाला हे उपक्रम राबविण्यात येतात. देवस्थानाचे २१ विश्वस्त आहेत. अध्यक्ष ओमप्रकाश सिंघानिया आहेत. गंगाकिसन भूत आणि निरज बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात कामकाज होत आहे. पुजारी राजीव गिरी यांच्या सात पिढ्या या ठिकाणी राबत आहेत.
मंदिराच्या मालकीची १०० एकर जमीन
देवस्थानाच्या जागेवर दुकान उभारण्यात आले आहेत. इतकेच नव्हेतर १०० एकर शेतजमिनीची मालकीही मंदिराला मिळाली आहे. भोसा, पिंपळगाव आणि तळणी कुऱ्हा या भागात मंदिराची जमीन आहे.
भाविकांच्या सोईकडे लक्ष देणार काय?
सध्याच्या २१ विश्वस्तांपैकी दोन सदस्य पूर्ण क्षमतेने काम पाहतात. मात्र इतरांचे दुर्लक्ष झाले. यामुळे मंदिराच्या विकासकामांना ब्रेक लागल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले. या ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. यामुळे भाविकांची गैरसोय होते. या उणीवांची दुरूस्ती व्हावी, असे मत भाविकांनी ‘लोकमत’कडे नोंदविले.

Web Title: Kedarnath Darshan is available in Shiva at Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.