सणासुदीत शांतता राखा
By admin | Published: August 14, 2016 01:08 AM2016-08-14T01:08:12+5:302016-08-14T01:08:12+5:30
आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, ...
पोलीस महानिरीक्षक : उमरखेड, पुसदमध्ये शांतता समितीची सभा
उमरखेड/पुसद : आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) विठ्ठलराव जाधव यांनी केले. शनिवारी उमरखेड आणि पुसद पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकींमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले.
उमरखेड येथे बोलताना पोलीस महानिरीक्षक यांनी दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत यंदा शांतता ठेवण्याची सूचना केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रभारी डिवायएसपी सदानंद मानकर, उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील, बिटरगावचे ठाणेदार सूरज बोंडे, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके, पुसद ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे उपस्थित होते.
उमरखेड आणि पुसद येथे झालेल्या बैठकांमध्ये नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वागत केले. उमरखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, इनायतउल्ला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नारायण भट्टड, मौलाना अख्तर नदवी, प्रशांत पतेवार, अॅड. संजय जाधव, साजीद जागिरदार, बळवंतराव नाईक, संजय भंडारे, महेश काळेश्वरकर, एजाज जनाब, सतीश नाईक, नितीन भुतडा, शिवाजी वानखेडे, शिवाजी माने, रमेश चव्हाण, प्रकाश आर्य, डॉ. अनिल काळबांडे, सदाशिव भेंडीकर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मीबाई मलकुलवार उपस्थित होते. (लोकमत चमू)
उमरखेड ठाणेदारांना अल्टीमेटम
उमरखेड शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ पायबंद घालावा. तसेच नागरिकांनी बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन तत्काळ निपटारा करा, असे निर्देश पोलीस महानिरीक्षकांनी उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांना दिले. या समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांचा अल्टीमेटम दिला.
पोलिसांचा सामान्यांशी संपर्क नाही
पुसदमध्ये शांतता समितीच्या बैठकीला अत्यल्प उपस्थिती राहते याचे कारण म्हणजे पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. पूर्वी शांतता समितीच्या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहात होते. मात्र आता पोलीसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने नागरिकांनी बैठकीकडे पाठ फिरविली आहे.