मनातील संवेदना जिवंत ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:18 PM2019-09-02T21:18:40+5:302019-09-02T21:19:41+5:30
मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हल्ली घरं मोठी झाली पण माणसांच्या मनाचे कोपरे संकुचित झाले आहे. मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी शंकर बडे ‘मायबोली सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते.
कवी शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन बबन सराडकर यांचा येथे आयोजित कार्यक्रमात सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव कसारे होते. प्रमुख पाहुणे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख, कीर्ती सांगळे-बडे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना बबन सराडकर म्हणाले, माणूस संवेदनशीलता हरवत चालला की काय, अशी आजुबाजूची परिस्थिती आहे. घरातील वडिलधारे अडगळीत आणि पाळीव प्राणी दिवानखान्यात अशी विसंगती बघायला मिळते. आपल्या घरातील लोकांवर मृत्यूनंतरचे सोपस्कार करून प्रेम दाखविण्याऐवजी जिवंतपणी त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना मायेचा आधार द्या, असे आवाहन त्यांनी केले.
शंकर बडे यांच्या स्मृतीनिमित्त घेतलेल्या वऱ्हाडी काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी झाले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केतकी कोंडेकर तर द्वितीय क्रमांक अश्विनी शेंबे या विद्यार्थिनीने मिळविला. यावेळी शंकर बडे यांच्या निवडक कवितांचे संगीतमय सादरीकरण व रसग्रहण ‘जावे कवितेच्या गावा’ या कार्यक्रमामधून झाले. प्रा. वसंत पुरके, प्रा. विवेक देशमुख व कीर्ती बडे-सांगळे यांनी काकांच्या कवितांचे विवेचन तर कवी जयंत चावरे यांनी निवेदन व अंजली सरुळकर, दत्तात्रय देशपांडे, राजू कोळवणकर, प्रकाश कुमरे, आकाश सैतवाल यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक नितीन पखाले यांनी तर संचालन स्नेहा लांडगे यांनी केले.
बडेंनी समाजाच्या वेदना वेचल्या
कवी शंकर बडेंचे बोट धरून आपण काव्य मैफलींमध्ये मुशाफिरी केली. बडेंनी कवितेतून समाजाच्या वेदना वेचल्या. उपेक्षित माणूस ते वाचायचे आणि त्यातून त्यांना कविता गवसली. त्यांच्या काव्यगंधाने आपली आयुष्यं सुगंधित केली. बडेंच्या कवितेचा सुगंध कायम दरवळत राहणार आहे, असे कवी बबन सराडकर म्हणाले. बडेंच्या नावाने मिळालेल्या मायबोली सन्मानाने आपण कृतार्थ झालो. गोतावळ्याने दिलेली ही कौतुकाची थाप अंत:करणावर मोरपीस फिरवणारी आहे. नातेसंबंध विसरण्याच्या काळात कवी बडे यांचा रक्तापलिकडचा गोतावळा त्यांच्या स्मृतींचा जागर करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार बबन सराडकर यांनी यावेळी काढले.