निर्गुडेचे खोरे झाले ‘कचराघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:12 PM2018-08-30T22:12:12+5:302018-08-30T22:13:10+5:30

मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते.

'Khacharghar' became the land of Nirgunda | निर्गुडेचे खोरे झाले ‘कचराघर’

निर्गुडेचे खोरे झाले ‘कचराघर’

Next
ठळक मुद्देनागरिकांची अनास्था : नदीपात्रात कचऱ्याचे ढिगारे, निर्माल्याचेही नदीतच विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मारेगाव तालुक्यासह वणी तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीचे खोरे अक्षरश: ‘कचरा घर’ बनले आहे. एकीकडे सरकार नद्यांच्या स्वच्छतेचा नारा देत असताना दुसरीकडे वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे हाल पाहता, सरकारचा नारा किती तकलादू आहे, हे दिसून येते. नदीच्या या प्रदूषणाला नागरिकांची बेपर्वा वृत्ती आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्याकडून होत आहे.
यावर्षी या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. मध्यंतरी आलेल्या मुसळधार पावसाने निर्गुडा नदीला अनेकदा पूर आला. गेल्या अनेक महिन्यात नदी पात्रात टाकण्यात आलेला केरकचरा पुरात वाहून आला. त्याचे आता नदीच्या पात्रात मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर प्लॉस्टीक पन्न्यांचा समावेश आहे. पर्यावरणाला घातक असलेले शेकडो टन प्लॉस्टीक नदीच्या पात्रात पडून आहे. यामुळे नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. नदीचे किनारे दुतर्फा घाणीने बरबटलेले आहे. नागरिक घरातील कचरा, निर्माल्याचे साहित्य नित्यनेमाने या नदीत आणून टाकत असल्याचे चित्र दररोजच पहायला मिळते. यामुळे नदी प्रदूषित होत असल्याची जाणिव त्यांना कोण करून देणार, हा प्रश्न पर्यावरणवाद्यांना छळत आहे. उघड्यावर शौैचास बसणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिकेचे गुडमॉर्निंग पथक कार्यरत आहे. मात्र आठवड्यातून एखाद्याच दिवशी या भागात पथकातील सदस्य गस्त घालताना दिसतात. अन्य दिवशी नदीच्या काठावर प्रात:र्विधी करणाऱ्यांची मोेठी गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे पालिकेचे पथक नदीच्या एकाच बाजुने कारवाई करताना दिसतात. दुसरी बाजू गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, आणि गणेशपूर ग्रामपंचायतीने अद्याप स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने किंवा उघड्यावर शौैचास करणाºयांवर कोणतीही बंदी घातली नसल्याने निगुर्डा नदीचे किनारे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. काही ठिकाणी नदी पात्रात मांस विक्रीसाठी जनावरांची कत्तल केली जात आहे. निरूपयोगी मांस नदीपात्रातच टाकले जात आहेत.
निर्देशांकडे दुर्लक्ष
नदी प्रदूषित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी अन्य जिल्ह्यात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच चौैघांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. मात्र या निर्देशाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत चालले आहे.
स्वच्छतेसाठी पुढाकार हवा
काही वर्षांपूर्वी वणीत निगुर्डा नदीचे खोलिकरण व स्वच्छतेसाठी स्थानिक राजकीय, सामाजिक संघटनांच्या पुढाकारात ‘मिशन निर्गुडा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर नदीच्या स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनीही नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी जागृक रहावे, नदी पात्रात कोणताही कचरा टाकला जाऊ नये, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 'Khacharghar' became the land of Nirgunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी